दैनिक स्थैर्य । दि. २५ जून २०२२ । सातारा । सातारा तालुक्यातील आकले येथे दोन कुटुंबात मारहाण झाली. या मारहाणीत लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आला. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या आहेत. यानंतर पोलिसांनी दोन्ही बाजुंच्या सात जणांवर गुन्हा नोंद केला आहे. ही घटना २३ जून रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी सुभाष संजय घागरे वय ३० यांनी तक्रार दिली. त्यानुसार मीना दशरथ घागरे, सचिन दशरथ घागरे आणि प्रियांका दशरथ घागरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, चुलती मीना घागरे रस्त्यावर आरडाओरडा करुन शिवीगाळ करत होत्या. यावरुन तक्रारदाराने कोणाला शिवीगाळ करता असे म्हटल्याने मारहाणीचा प्रकार सुरु झाला. यावेळी लाकडी दांडक्याचा वापर करण्यात आला. या मारहाणीत फिर्यादी जखमी झाला आहे. दरम्यान, दुसरी तक्रार सचिन दशरथ घागरे यांनी दिली आहे. या तक्रारीनुसार संजय सीताराम घागरे, सुभाष संजय घागरे, नीलेश संजय घागरे आणि निर्मला संजय घागरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. जमिनीच्या कारणातून सुरु असणाऱ्या दाव्याचा राग मनात धरुन शिवीगाळ करुन लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.