स्थैर्य, सातारा दि. 07 : सातारा शहर उपनगरातील करंजे तर्फ सातारा येथील मानकेश्वर मंदिर व भैरोबा मंदिराशेजारी दोन युवकांच्या गटात धारदार कोयता, रॉडसह हॉकी स्टीकने तुफान राडा झाला. या हल्ल्यात युवकाच्या खुनाचा प्रयत्न झाल्याने विविध कलमाअंतर्गत परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून तणावाची परिस्थिती आहे.
सिद्धांत संजय किर्दत, अजिंक्य गणेश किर्दत, मयुरेश रवींद्र भोसले (सर्व रा. करंजे पेठ, सातारा) या संशयित आरोपींविरुद्ध हाफ मर्डरचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रथम अरुण पिसाळ (वय 18, रा.रघुनाथपुरा पेठ, करंजे) या युवकाने शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी दि. 6 रोजी सायंकाळी 6.30 वाजता मानकेश्वर मैदान, करंजे तर्फ सातारा येथे घडली आहे. यातील तक्रारदार प्रथम पिसाळ हा युवक मित्रांसोबत गप्पा मारत बसला होता. त्यावेळी संशयित आरोपी तेथे आले व त्यांनी तक्रारदार युवकाला शिवीगाळ, दमदाटी करण्यास सुरुवात केली. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. संशयित वाद घालत असताना त्यातील एकाने धारदार कोयता काढून तर दुसऱ्याने रॉड काढून तक्रारदारावर हल्ला चढवला. या हल्ल्यात तक्रारदार युवकावर वार झाले असून त्यात जो जखमी झाला आहे. हल्ल्यानंतर संशयित युवक तेथून पळून गेले.
दुसरी तक्रार सिध्दांत संजय किर्दत (वय 19, रा.करंजे) याने प्रथमेश अरुण पिसाळ, सोमनाथ दिपक पवार, शुभम पिसाळ, चिन्मय गायकवाड, मितेश पिसाळ (सर्व रा.करंजे) यांच्याविरुध्द शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 6 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास भैरोबा मंदीराशेजारी करंजे येथे घडली आहे. तक्रारदार युवक मित्रासोबत गप्पा मारत बसला असताना त्याठिकाणी संशयित आले व त्यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान संशयितांनी हॉकी स्टीकने मारहाण केली. मारहाणीनंतर संशयित तेथून पसार झाले. दरम्यान, पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दोन्ही गटाविरुध्द परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.