कामात व्यत्यय न आणण्यासाठी नरेंद्र पाटील यांनी 50 हजार मागितले ठेकेदाराच्याच्या कामगाराची तक्रार : जातीवाचक शिवीगाळही केल्याचा आरोप
स्थैर्य, सातारा : नरेंद्र पाटील यांना मारहाण केल्याप्रकरणी परस्परविरोधी फिर्याद दाखल झाली आहे. सबंधित ठेकेदार गणेश पवार यांच्या कामगार सचिन बनसोडे यांनी नरेंद्र पाटील यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचे तसेच मालक गणेश पवार यांच्या कामाबाबत पालिकेत तक्रार न करण्यासाठी 50 हजारांची मागणी केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. पालिकेतील हाणामारी नाट्याची ही दुसरी बाजू समोर आल्याने पालिकेत पुन्हा खळबळ माजली आहे.
बाबत सचिन परशुराम बनसोडे यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ते ठेकेदार गणेश पवार रा. करंजे यांच्याकडे रस्ते डांबरीकरण करणे, पॅचींग करणे, पाईपलाईन बसवणे त्याची साफसफाई आदी कामे करतात. जानेवारी 2019 मध्ये एस टी.स्टँड ते पारंगे चौकाचे रस्ता पॅचिंगचे काम सुरु असताना नवी प्रशासकीय इमारतीचे समोरील रोडवर नरेंद्र पाटील तेथे आले व मला काम बंद करण्यास सांगितले. मी त्यांना म्हणालो आमचे मालकांशी बोला, असे सांगितले असता नरेंद्र पाटील यांनी मला शिवीगाळ केली. थोड्या वेळानंतर ठेकेदार गणेश पवार आले. त्यांच्यात व नरेंद्र पाटील यांच्यात शासकीय इमारतीचे अलिकडील बाजुस चर्चा झाली. त्यानंतर थोड्या वेळाने गणेश पवार यांनी आम्हास काम सुरू करण्यास सांगितले. त्यानंतर अंदाजे 15 दिवसांनी मी, सुपरवायझर करचे मामा, रवी कुंभार मिलीटरी कॅन्टीनचे रोडचे पॅचींगचे करत असताना नरेंद्र पाटील तेथे आले. त्यांनी कामावर असलेले खोरे हातात घेवून काम बंद करा नाहीतर मारीन, असे म्हणून दमदाटी करुन काम बंद केले व मला गणेश पवार यांना बोलाविणेस सांगितले. मी पवार यांना बोलावून घेतले. गणेश पवार व नरेंद्र पाटील यांचे बोलणे सुरु होते. थोड्या वेळाने पवार व पाटील यांच्यात वाद सुरू झाला. मी तसेच करचे मामा, रवी कुंभार वाद मिटवण्यासाठी गेलो असता नरेंद्र पाटील हे मला म्हणाले की, तुला जे तुझ्या जातीनं काम दिल आहे तेच कर आमचेत तु पडु नको, असे म्हणाले. थोड्या वेळाने नरेंद्र पाटील निघुन गेले. त्यावेळी मी गणेश पवार यांना या प्रकाराबाबत विचारले असता पवार यांनी सांगितले की, एस.टी. स्टॅण्डजवळ काम सुरू होते त्यावेळी नरेंद्र पाटील यांनी त्या कामाची तक्रार करणार नाही म्हणुन माझ्याकडून 50 हजार घेतले होते. आता इथेही काम सुरू आहे. याठिकाणी व्यत्यय न आणण्यासाठी नरेंद्र पाटील 50 हजारांची मागणी करत आहेत. मात्र, मी ते देवू शकत नसल्याने दमदाटी करत असल्याचे सांगितले.
आज दि. 15 रोजी गणेश पवार हे एसटी स्टँड ते सिव्हिल हॉस्पिटल पॅचिंगच्या बिलासंदर्भात पालिकेत गेले होते. त्याबाबत अभियंता प्रभुणे यांच्याशी चर्चा सुरू होती. त्यावेळी नरेंद्र पाटील तेथे आले. गणेश पवार यांनी नरेंद्र पाटील यांना ‘आमचे काम का बंद करता? का आम्हाला का त्रास देता? असे विचारले असता नरेंद्र पाटील यांनी ठेकेदार गणेश पवार यांस तु मिलिट्री कॅन्टीन कामाचे अजुन 50 हजार रुपये दिलेले नाहीस. पैसे दिले नाहीस तर यापुढे काम मिळू देणार नाही व करू देणार, मशीन जाळीन असे म्हणुन शिवीगाळ केली. यावेळी मी दादा, तुम्ही आमचे काम बंद पाडणे योग्य आहे का? आमचे कामावर पोट चालते असे म्हणालो असता पाटील म्हणाले की, तुला तुझ्या जातीने जे काम दिले आहे ते तु कर. तुम्हाला गावातून बाहेर कशासाठी ठेवले आहे? तेवढीच कामे तुम्ही करा. मध्ये बोलू नकोस असे बोलुन मला धक्काबुक्की करुन शर्टला ओढून फाडुन तु मला यापुढे कामावर दिस तुझ्याकडे बघतो अशी शिवीगाळ करून धमकी दिली. तसेच माझ्यासह ठेकेदार गणेश पवार यांनाही धक्काबुकी करुन दमदाटी केली, असेही तक्रारीत म्हटले आहे.