स्थैर्य, सातारा, दि. 7 : वनवासवाडी, ता. सातारा परिसरातून एलसीबीच्या पथकाने सराईत मोबाईल चोरट्यास ताब्यात घेतले. संबंधित चोरटा अल्पवयीन असून त्याच्याकडून पोलिसांनी पावणे दोन लाख रुपयांचे 15 महागडे मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. त्याच्याकडे चौकशी केली असता 35 ठिकाणी मोबाईल चोरल्याची कबुली त्याने दिली आहे.
याबाबत माहिती अशी, वनवासवाडी, ता. जि. सातारा डॉ.आंबेडकर भवन येथे मोबाईल चोरी करणारा सराईत विधीसंघर्ष बालक चोरलेले मोबाईल विक्रीकरीता घेवुन येणार आहे, अशी खात्रीशीर माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार एलसीबीचे पथकाने वनवासवाडी भागात डॉ.आंबेडकर भवन येथे सापळा रचला. यावेळी संबंधित सराईत विधीसंघर्ष बालक हातात प्लॅस्टीकच्या पिशवीत चोरीचे मोबाईल घेवून आला. त्यास जागीच ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपुस केली असता त्याने शिवराज पेट्रोल पंपाच्या पाठीमागे, मयुरेश पार्क, सदरबझार, रामलक्ष्मी सोसायटी, कृष्णानगर, निशिगंधा कॉलनी, समर्थनगर, कोडोली येथून दोन मोबाईल, त्रिमुर्ती कॉलनी, गोडोली नगरपरिषद कॉलनी सदरबझार, पालवी चौक, गोडोली नाका, मातंग वस्ती कोडोली, चाहुर, मल्हार पेठ, महिंद्रा शोरुमशेजारी, पुणे-बेंगलोर हायवेवर ट्रकमधुन व सातारा शहर व तालुका परिसरातून घरातून आतापर्यंत 35 ठिकाणाहुन मोबाईलची चोरी केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून रेड-मी, वन प्लस 7, ओप्पो, विवो या कंपन्यांचे 15 महागडे मोबाईल फोन असा पावणे दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यामुळे सातारा शहर पोलीस स्टेशनला दाखल असलेले सहा चोरीचे गुन्हेही उघड केले असून ज्यांचे मोबाईल चोरीला गेले आहेत त्यांनी सातारा शहर पोलीसांत येवून जप्त मोबाईल बाबत खात्री करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील यांनी दिलेल्या सूचनेनुसार एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आनंदसिंह साबळे, सहा.फौजदार ज्योतीराम बर्गे, हवालदार सुधीर बनकर, विनोद गायकवाड, मोहन नाचन, संतोष जाधव, नितीन भोसले, राजकुमार ननावरे, गणेश कापरे, धिरज महाडीक, वैभव सावंत, मोहसिन मोमीन, संजय जाधव, गणेश कचरे यांनी सहभाग घेतला होता.