लैंगिक काम करणाऱ्यांना शिक्षीत करण्यासाठी कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ जुलै २०२२ । सातारा ।  प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती मंगला ज. धोटे, अध्यक्षा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सातारा यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा आयोजित  लैंगिक काम करणाऱ्यांना शिक्षीत करण्यासाठी  कार्यशाळा शिबीर जिल्हा न्यायालयातील रामशास्त्री सभागृहात संपन्न झाली.

यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव   तृप्ती जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये   सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अशा कार्यशाळा दर महिन्याला आयोजित करण्याचे सांगून यातील महत्वाच्या निर्देशांची माहिती उपस्थितांना सांगितली व  सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करण्याचे सर्वांना आवाहन केले.

पॅनेल विधिज्ञ अॅड राजश्री सावंत  यांनी   सर्वोच्च न्यायालयाच्या फौ.अपील क्र.१३५/२०१० मधील न्यायनिर्णयामध्ये दिलेल्या निर्देशांचे मार्गदर्शन केले. यामध्ये पोलीस विभागाने, मिडीया विभागाने आणि आरोग्य विभागाने कोणत्या गोष्टींचे पालन करावे या बाबतीत दिलेल्या निर्देशाबाबत व लैंगिक काम करणा-या व्यक्तींच्या हक्काबाबत सविस्तर माहिती दिली.

राष्ट्रीय नेटवर्क ऑफ सेक्स वर्करसच्या अध्यक्षा श्रीमती किरण देशमुख यांनी लैंगिक काम करणाऱ्यांना  येणाऱ्या अडचणीचा खुलासा केला व  सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयामुळे त्यांना दिलासा मिळाल्याचे सांगितले. तर जिल्हा सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी हेमंत भोसले यांनी आरोग्य खात्यामार्फत लैंगिक काम करणा-यांना न्यायनिर्णयाच्या निर्देशानुसार मदत करण्यासाठी कार्यवाही सुरु केली असल्याचे सांगितले. त्यांनी लैंगिक काम करणा-यांना आरोग्य खात्यामार्फत मिळणारे सहाय्य याबाबत विवेचन केले.

पोलीस विभागामार्फत विशेष महिला पथक भरोसा सेलच्या  ए.पी.आय. श्रीमती मेणकर यांनी पोलीस  विभागामार्फत    लैंगिक  काम करणा-यांना या न्यायनिर्णयातील निर्देशानुसार पूर्णतः सहकार्य करण्याबाबत सूचित केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक   दिलीप भोसले, लघुलेखक यांनी केले. या कार्यक्रमास सातारा जिल्ह्यातील   संबंधित पोलीस अधिकारी, महिला व बाल विकास कार्यालयातील आणि आरोग्य विभागाकडील  अधिकारी,  पत्रकार, लैंगिक सेवा देणारे व संग्राम संस्थेचे पदाधिकारी  आदि उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन  लघुलेखक  दिलीप भोसले यांनी मानले.  तसेच सहाय्य व सल्ला मिळणेसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन केले.


Back to top button
Don`t copy text!