दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आणि मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ यांच्या माध्यमातून महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी नेतृत्व विकास प्रशिक्षण आणि आर्थिक जोखीम व्यवस्थापन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये नेतृत्व, प्रेरणा, आव्हानात्मक परिस्थितीत व्यवस्थापकीय निर्णय क्षमता विकसित करणे, आर्थिक निरोगीपणा, जोखीम व्यवस्थापन पद्धती आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
अल्पसंख्याक विकास विभागाच्या तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव जयश्री मुखर्जी यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. जमनालाल बजाज संस्थेचे संचालक प्रा. डॉ. श्रीनिवासन आर. अय्यंगार, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. लालमिया शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
प्रा. डॉ. अय्यंगार यांनी जमनालाल बजाज संस्थेमार्फत आयोजित केलेल्या काही प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले, जमनालाल बजाज संस्थेने नेहमीच गुणवत्तेला महत्त्व दिले आहे. सध्याचा प्रशिक्षण कार्यक्रम महामंडळाच्या आवश्यकतेनुसार तयार करण्यात आला आहे. सहभागींना हा कार्यक्रम अतिशय नाविन्यपूर्ण आणि उपयुक्त वाटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
डॉ. शेख यांनी महामंडळामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांबाबत माहिती सांगितली. महामंडळाच्या विविध समस्या आणि आव्हानांचा उल्लेख केला. जमनालाल बजाज संस्थेच्या सहकार्यातून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाद्वारे महामंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्याबरोबरच त्यांचे अधिक सक्षमीकरण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महामंडळातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण यशस्वी केल्याबद्दल डॉ. शेख, प्रा. डॉ. अय्यंगार यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.