
स्थैर्य, फलटण, दि. १९ सप्टेंबर : गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी आणि सोयाबीन, मका, कापूस यांसारख्या पिकांची पंतप्रधान आशा योजनेंतर्गत किमान आधारभूत किंमतीने (MSP) खरेदी केंद्रे त्वरित सुरू करावीत, या प्रमुख मागण्यांसाठी भारतीय किसान संघ आक्रमक झाला आहे. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला असून, याबाबतचे निवेदन फलटण तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.
भारतीय किसान संघाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या महिन्याभरातील अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन, भात, उडीद, मटकी, नाचणी यांसारखी हाता-तोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी.
सध्या बाजारात उडदासारख्या पिकांचे दर हमीभावापेक्षा कमी झाले असूनही, शासनाने खरेदी केंद्रे सुरू केलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल कमी दरात विकावा लागत आहे. शासनाने तातडीने हमीभावाने शेतमाल खरेदी केंद्रे सुरू करावीत, अशी मागणीही करण्यात आली आहे.
याशिवाय, पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक होत असून, मागील वर्षाची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही. पीक पाहणी ॲपमधील तांत्रिक अडचणी दूर कराव्यात आणि पीक-कर्ज नोंदणीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशा मागण्याही या निवेदनात करण्यात आल्या आहेत.