दैनिक स्थैर्य | दि. ०२ नोव्हेंबर २०२१ | सातारा | महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील विविध शाळांमधील 773 विद्यार्थींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले असून यामुळे विद्यार्थींनींचा आत्मविश्वास वाढला असल्याचे अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी सांगितले.
येथील पोलीस विभागाच्या अलंकार हॉलमध्ये महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाच्या तिसऱ्या सत्राचा समारोप श्री. बोऱ्हाडे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उपशिक्षणाधिकारी श्रीकांत जगदाळे यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी व विविध शाळांमधील विद्यार्थींनी उपस्थित होत्या.
जिल्ह्यातील विविध शाळांमधील 773 विद्यार्थींनीना या प्रकल्पांतर्गत स्वसंरक्षणाचे धडे दिले आहेत. ज्या मुलींनी प्रशिक्षण घेतले आहे त्यांनी इतर मुलींनाही प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. दिवाळीनंतर प्रत्येक शाळेमध्ये जावून मुलींना स्वसरंक्षणाचे धडे देण्यात येणार असून त्याचे नियोजनही झाले असल्याचे श्री. बोऱ्हाडे यांनी समारोपाप्रसंगी सांगितले.
या कार्यक्रमात तिसऱ्या सत्रामध्ये सहभाग घेतलेल्या विद्यार्थींनीना प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. या महिला पथदर्शी प्रकल्पांतर्गत देण्यात आलेले स्वसंरक्षणाचे धडे भविष्यात उपयुक्त ठरणार असून आमचा आत्मविश्वास वाढला असल्याच्या भावनाही विद्यार्थींनी यावेळी बोलून दाखविल्या.