स्थैर्य, सातारा, दि. १६: कला सादर झाली तरच कलाकाराच्या कुटुंबाचे पोट भरते. मात्र, लॉकडाऊनपासून ते आजपर्यंत सर्वच क्षेत्रातील कलाकारांचे कार्यक्रम बंद झाल्यामुळे गेली सहा महिने कलाकार आणि त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. याबाबत प्रशासन आणि सर्व मंत्रीमहोदयांना भेटूनही दखल घेतली जात नसल्याने कलाकार महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शंखध्वनी आंदोलन करण्यात आले.
याबाबत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल मोरे यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, कलाकार आपली कला सादर करूनच आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असतो. गेल्या वर्षभरात कलाकारांच्यावर अनेक संकटे येवून गेली आणि आता जगभरामध्ये कोरोनाने थैमान घातले. लॉकडावून जाहीर झाले आणि यात्रा जत्रा लग्नसमारंभ व आता गणेश उत्सव हाही गेला. सर्व क्षेत्रातील कलाकारांचे कार्यक्रम बंद झाले. कलाकार घरातच बसून प्रशासनाला मदत करत राहिला. कलाकारांची कला सादर झाली तरच त्यांच्या कुटुंबाच पोट भरतं. गेले 5 ते 6 महिने कलाकार-मालक घरीच बसून राहिल्याने कलाकार व मालक लोकांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, तसेच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांना निवेदने देवून तसेच प्रत्यक्ष भेटून कलाकारांच्या व्यथा मांडल्या. प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री यांना मदत जाहीर करण्यासाठी विनंती केली. मागण्या मान्य न झाल्याने दि. 24 ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्हा अधिकारी कार्यालयसमोर ढोल बजावो आंदोलन केले. तसेच रास्ता रोको आंदोलन दि.04 सप्टेंबरला केलेले आहे. सरकारने लवकरात लवकर मदत जाहीर करावी. दि. 30 सप्टेंबरपर्यंत कलाकारांचे व मालक लोकांचे झालेले नुकसान भरपाई म्हणून मदत जाहीर नाही झाली तर दिनांक 4 ऑक्टोबर रोजी विधान भवनासमोर आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.