स्थैर्य, वाई, दि. २६ : कवठे, ता. वाई येथील एक पोलीस पुणे येथे नोकरीसाठी गेला असताना तेथील नियमानुसार त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्याचा चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या सानिध्यात आलेले त्याच्या कुटुंबातील 7 सदस्य व गावातील 12 निकटवर्तीय किसन वीर महाविद्यालय, वाई येथे पुढील तपासणीसाठी गेले होते. चाचणीसाठी गेलेल्या 19 निकटवर्तियांपैकी 11 जणांचा अहवाल आला असून यातील 10 लोकांचे अहवाल निगेटिव्ह आले असून एक 20 वर्षीय युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. उर्वरित 8 जणांचा अहवाल अजून प्रतीक्षेत आहे. पहिली बाधित व्यक्ती राहत असलेल्या ठिकाणचा कंटेन्मेंट झोन प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर यांनी याअगोदर जाहीर केला आहे.
दि. 24 रोजी आलेल्या अहवालानुसार बाधित झालेल्या दुसर्या 20 वर्षीय युवकाच्या घरातील 6 लोकांनासुद्धा आज किसन वीर महाविद्यालय या ठिकाणी क्वारंन्टाईन करण्यात आले असून आज त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने पुढील तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. काल स्वॅब घेतलेल्या उर्वरित आठ जणांचे अहवाल आज प्राप्त होणार असून आज स्वॅब घेतलेल्या 6 जणांचे अहवाल उद्या रात्री हाती येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सुरूर मंडलचे सर्कल संतोष जाधव, कवठे गावच्या तलाठी, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील तसेच आपत्ती व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत कवठे गाव परिसरात आज दुसर्या ठिकाणी कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात आला आहे. हा परिसर सील करण्यात आला असून कोरोनाची साखळी फैलावू नये म्हणून व ही साखळी तोडण्यासाठी गाव परिसरातील नागरिकांनी घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन यावेळी सर्कल संतोष जाधव यांनी केले आहे.
कवठे ग्रामस्थांची चिंता वाढली. काल रात्रीच्या अहवालानुसार कवठे गावातील दुसरी व्यक्ती बाधित सापडल्याने ही चेन वाढण्याचा धोका असल्याने कवठे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अजून दोन दिवस सलग अहवाल येणार असल्याने रात्री अहवाल यायच्या कालावधीमध्ये कवठे गावामध्ये चिंतेचे वातावरण पसरत आहे. या बाधितांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे न दिसता अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने ग्रामस्थांच्या चिंतेत वाढ होत आहे.