ग्रंथवाचनाने विविध विषय व अनेकविध क्षेत्रांचे सर्वांगीण आकलन – अरविंद मेहता

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३ एप्रिल २०२३ | फलटण |
आजच्या सोशल मिडियाच्या काळातही ग्रंथांची उपयुक्तता महत्त्वपूर्ण ठरत आहे. ग्रंथवाचनाने वर्तमान, भूत व भविष्यकाळाचे संदर्भ तपासता येतात. तसेच विविध विषय व अनेकविध क्षेत्रांचे सर्वांगीण आकलनही ग्रंथांमुळे होत असल्याचे निदर्शनास आणून देत ग्रंथवाचनाने सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक बाबींचे ज्ञान वृध्दींगत होत असल्याचे मुधोजी महाविद्यालय विकास समिती सदस्य व ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी सांगितले.

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे मराठी विभाग आयोजित मराठी भाषा संवर्धन विशेष सप्ताहांतर्गत ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून अरविंद मेहता बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम होते. उपप्राचार्य प्रा. डॉ. संजय दीक्षित व मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर पवार यावेळी उपस्थित होते.

ग्रंथवाचनाने केवळ ज्ञानप्राप्तीच होते असे नव्हे, तर त्यायोगे वाचकांची संशोधन वृत्तीही विकसित होत असल्याचे अरविंद मेहता यांनी यावेळी सांगून ते पुढे म्हणाले की, आज विद्यार्थी व विविध समाज घटकांमध्ये वाचनाची आवड वाढायला हवी. माहिती तंत्रज्ञानाच्या या काळात मोबाईलच्या माध्यमातून सर्व बाबींची माहिती आपणास क्षणार्धात मिळत असल्याने पुस्तकाचा सहवास व संपर्क काहीसा कमी होताना दिसत आहे. असे असले तरी आजही बरेच ग्रंथप्रेमी लोक पहावयास मिळतात. ग्रंथांना गुरूचे स्थान दिले जाते. सर्व प्रकारची माहिती ग्रंथांद्वारेच आपणास मिळते. कथा, कविता, कांदबरी व इतर साहित्य प्रकारातून मनोरंजनाबरोबरच वाचकाची कल्पनाशक्ती व सामाजिक दृष्टीही विकसित होते. मराठी साहित्य लेखनाला खूप प्राचीन व समृद्ध परंपरा आहे. प्रारंभीच्या काळात अनेक धर्म, पंथ व संप्रदायांशी संबंधित ग्रंथांनी त्या-त्या धर्माची संस्कृती व विचारसरणी समृद्ध करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केलेले दिसते. अशा प्राचीन व दुर्मिळ ग्रंथांचे जतन व पुनर्मुद्रण होणे आवश्यक आहे.

या ग्रंथ प्रदर्शनामध्ये मध्ययुगीन मराठी वाङ्मय, आधुनिककालीन मराठी वाङ्मय, स्वातंत्र्यपूर्व मराठी वाङ्मय, साठोत्तरी मराठी वाङ्मय, नव्वदोत्तरी मराठी वाङ्मय, समीक्षा व कोशवाङ्मय आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी वाङ्मय अशा आठ दालनांमध्ये त्या -त्या कालखंडातील महत्त्वपूर्ण व प्रभावी सुमारे १२५ ग्रंथ ठेवले होते. या ग्रंथांबाबत संबंधित दालनातील विद्यार्थी भेट देणार्‍या प्रेक्षकांना माहिती देत होते. या प्रदर्शनामध्ये लीळा चरित्रापासून ते आजच्या काळातील नावाजलेले ग्रंथ मांडण्यात आले होते. शेवटच्या दालनात ‘स्वतःसह स्वाक्षरी’ या उपक्रमांतर्गत एका फलकावरील मराठी स्वाक्षरीसह स्वतःच स्वतःचा फोटो काढून मराठी भाषेविषयी आस्था व प्रेम प्रकट करून मराठी भाषा वापराचा संदेश देण्याचा हेतू होता.

अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ. कदम यांनी या उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. ग्रंथ वाचन व मराठी भाषा संवर्धनाबाबत आपले विचार व्यक्त करताना, ग्रंथ वाचनातून विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडते, यशिवाय मराठी भाषा व साहित्याचे आकलन स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
या कार्यक्रमाचे संयोजक प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात ग्रंथ प्रदर्शन या उपक्रमाचा उद्देश व ग्रंथ निवडीबाबत माहिती दिली तर प्रा. शैला क्षीरसागर यांनी सर्वांचे आभार मानले.
या उपक्रमास महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाचा विशेष सहयोग लाभला. या उपक्रमास विविध विभागातील विद्यार्थी व शिक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

मराठी भाषा संवर्धन विशेष सप्ताहांतर्गत मुधोजी महाविद्यालयात अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, मराठी साहित्य निर्मिती, समीक्षा व संशोधनास गती मिळावी, मराठी भाषा व साहित्याविषयी अभिरूची निर्माण व्हावी, या उद्देशाने अनेक कार्यक्रम आयोजित केले होते. त्यामध्ये प्रामुख्याने प्रसिद्ध कवी विकास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ‘काव्यवाचन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी कवींनी सहभाग घेतला. ‘व्यवसाय निर्मिती कार्यशाळा’ या उपक्रमांतर्गत माजी विद्यार्थिनी कांचन काशिद यांनी ‘फॅशन डिझायनिंग’ या विषयी मार्गदर्शन करताना काही प्रात्यक्षिके दाखविली. शहीद दिनानिमित्त प्रा. निलम देशमुख यांचे ‘राजमाता जिजाऊ : कार्य व कर्तृत्त्व’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

पोस्टर प्रदर्शन उपक्रमांतर्गत मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘मराठीचे मानकरी’ या भित्तीपत्रकाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. कौशल्य विकास उपक्रमांतर्गत मेहंदी स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

सप्ताहाची सांगता क्षेत्रभेट उपक्रमाने झाली. यानिमित्ताने फलटण शहरातील सुमारे १५० वर्षांपूर्वीच्या शिवाजी वाचनालय व ज्ञानेश्वर वाचनालय या ग्रंथालयांना भेटी देण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांना अनेक जुने, नवे, दुर्मिळ व वाचनीय ग्रंथ पाहायला व हाताळायला मिळाले.

या सप्ताहातील विविध उपक्रमांचे संयोजन मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर पवार, प्रा. डॉ. अशोक शिंदे, प्रा. शैला क्षीरसागर व डॉ. कोकीळा चांगण यांनी केले तर पदवी व पदव्युत्तर विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये ऊस्फूर्त सहभाग घेऊन हा सप्ताह यशस्वी केला. सर्व कार्यक्रमांना महाविद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.


Back to top button
Don`t copy text!