लाड समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सर्वसमावेशक तरतुदींचा समावेश असावा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२२ । मुंबई । लाड- पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगारांच्या वारसांना हक्कांनुसार रोजगार उपलब्ध करून दिला जातो. वारसा हक्काच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वसमावेशक तरतुदींचा समावेश करून प्रारूप आराखडा सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

लाड समितीच्या शिफारशींच्या अनुषंगाने सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीबाबत सुधारित तरतुदींच्या अनुषंगाने मंत्रिमंडळ उपसमितीस सादरीकरण आज दुपारी सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, महात्मा फुले विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले, शासकीय, निमशासकीय, महानगरपालिका, नगरपालिका, कटकमंडळे, नगरपरिषद, राज्य शासनाची महामंडळे, राज्य शासनाच्या स्वायत्त संस्था, अनुदानित संस्थांच्या आस्थापनामधील सफाई कामगारांची सेवानिवृत्ती, मृत्यू, स्वेच्छा निवृत्ती किंवा त्यांना वैद्यकीय दृष्टीने अपात्र ठरविल्यानंतर सफाई कामगारांचे आर्थिक नुकसान होऊ नये, कुटुंब बेघर होऊ नये, त्यांना सामाजिक संरक्षण मिळण्यासाठी लाड समितीच्या शिफारशींनुसार संबंधित कामगाराच्या जागी त्याच्या वारसाची नियमानुसार वारसा हक्काने नियुक्ती करण्याची कार्यवाही करण्यात येते. त्यासाठी यापूर्वीच विविध सूचना देण्यात आल्या आहेत.

लाड समितीने सफाई कामगारांच्या वारसास वारसा हक्काने नियुक्ती देण्याच्या अनुषंगाने केलेल्या शिफारशीस अनुसरून सर्व शासन निर्णयांचे एकत्रीकरण करून सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला होता. त्यानुसार मंत्रिमंडळ उपसमिती गठित करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसमावेशक आणि सफाई कामगारांच्या हितांना प्राधान्य देणाऱ्या प्रारुप तरतुदींचा समावेश करावा, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मंत्री श्री. भुसे यांनीही विविध सूचना केल्या. सामाजिक न्याय आणि विशेष साहाय्य विभागाचे सचिव श्री. भांगे यांनी सफाई कामगारांच्या वारसा हक्क अंमलबजावणी बाबत सुधारित तरतुदींची सविस्तर माहिती दिली.


Back to top button
Don`t copy text!