झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या अनुषंगाने लवकरच सर्वंकष धोरण – गृहनिर्माणमंत्री अतुल सावे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २२ जुलै २०२३ । मुंबई । मुंबई शहरामध्ये अनेक झोपडपट्टी पुनर्वसन योजना अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. त्या झोपड्यांचे हस्तांतरण, विक्री बाबत येणाऱ्या अडचणी विचारात घेऊन यासंदर्भातील समस्यांबाबत लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावून सर्वंकष धोरण निश्चित करण्यात येईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत दिली.

सदस्य ॲड. आशिष शेलार यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. सावे यांनी उत्तर दिले.

ते म्हणाले की, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा मूळ उद्देश झोपडपट्टीवासियांचे जीवनमान उंचावणे हा आहे. अंतिम परिशिष्ट -2 मध्ये पात्र ठरविलेल्या झोपडपट्टीवासियांना पुनर्वसन सदनिकेचे वाटप करण्यापूर्वी संबंधित सदनिकांची खरेदी विक्री करण्याचे प्रकार होतात. या प्रकरणातील सर्व अडचणींचा विचार करुन आणि झोपडपट्टीधारकांना निवारा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने लवकरच गृहनिर्माण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सर्वंकष धोरण निश्चित करण्याची कार्यवाही केली जाईल. यासंदर्भात संबंधित लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांचे म्हणणे निश्चितपणे ऐकून घेतले जाईल, असे मंत्री श्री. सावे यांनी सांगितले.

सदस्य जितेंद्र आव्हाड, वर्षा गायकवाड, अतुल भातखळकर, सुनील राणे, कालिदास कोळंबकर, संजय केळकर, अमीन पटेल आदींनी यावेळी उपप्रश्न विचारले.


Back to top button
Don`t copy text!