संगीतकार कुणाल – करणने संगीतबद्ध केलं ‘महामिनिस्टर’चं टायटल ट्रॅक, आदेश बांदेकर आणि अवधुत गुप्ते यांनी केलं कौतुक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ एप्रिल २०२२ । सातारा । अनेक लोकप्रिय मालिकांचे टायटल ट्रॅक आणि ट्रेंडींग गाण्यांना संगीत देणारी मराठमोळी जोडी म्हणजे कुणाल भगत आणि करण सावंत. २०१९ मध्ये कुणाल – करण यांना अल्टी पल्टी या मालिकेच्या टायटल ट्रॅक साठी झी गौरव पुरस्काराचे नॉमिनेशन मिळाले होते.

गेल्या १८ वर्षापासून सुरू असणाऱ्या झी मराठीवरील ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय शोचं नविन पर्व येत आहे. या ‘महामिनिस्टर’ शोचं टायटल ट्रॅक नुकतंच अभिनेते आदेश बांदेकर यांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे. विशेष म्हणजे हे भन्नाट टायटल ट्रॅक संगीतकार कुणाल – करण यांनी लिहीलं असून संगीतबद्ध ही त्यांनीच केलं आहे‌. गायक अवधुत गुप्ते यांनी हे टायटल ट्रॅक गायलं आहे.

संगीतकार कुणाल – करण ‘महामिनिस्टर’च्या टायटल ट्रॅक विषयी सांगतात, “खरंतर खूप छान वाटत आहे की आम्ही झी मराठी वाहिनीचा एक भाग आहोत. याआधी झी मराठी वरील ‘अल्टी पल्टी सुमडीत कल्टी, किचन कल्लाकार, ब्रॅंड बाजा वरात अश्या मालिकांच्या टायटल ट्रॅकना आम्ही संगीत दिले. आम्हाला जेव्हा कळलं ‘महामिनिस्टर’चं टायटल ट्रॅक आम्हाला करायचं आहे तेव्हा खूप भारी वाटलं पण जबाबदारी होती. कारण हा शो फारच लोकप्रिय आहे. थोडं दडपण होतं की हे गाणं दमदार आणि हटके व्हावं. आम्ही गाणं बनवलं आणि ते लगेच फायनल देखिल झालं. आज हे गाणं सगळ्यांच्या पसंतीस पडतंय हे समाधानकारक आहे.

पुढे ते सांगतात, “अवधुत गुप्ते यांच्या सोबत रेकॉर्डींग करतानाचा अनुभव अविस्मरणीय होता. तसंच रेकॉर्डींग दरम्यान महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणजे आदेश बांदेकर सर. त्यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी आमचे कौतुक करून आर्शीवाद दिले. आमचा मित्र मिक्सींग इंजिनिअर अजिंक्य ढापरे याची प्रत्येक प्रोजेक्टला कायम साथ असते. तसंच, झी मराठी वाहिनी इतक्या वर्षांपासून आमच्यावर विश्वास दाखवत आहे, त्यांचे मनापासून आभार. आमचा सांगितीक प्रवास अविरत सुरू राहावा. हीच सदिच्छा!”

आदेश बांदेकर संगीतकार कुणाल – करणचं कौतुक करताना म्हणाले, “महामिनिस्टरची ११ लाखांची पैठणी कोणाला मिळणार हा प्रश्न पडलेला असताना, कुणाल – करण यांनी शोला साजेसं सुंदर असं टायटल ट्रॅक लिहून ते संगीतबद्ध केलं आहे. त्यामुळे या शोला साज चढला आहे. त्यांच्या मेहनतीला मायबाप रसिकांनी उत्तम दाद दिली आहे.”

गायक अवधुत गुप्ते रेकॉर्डींग विषयी म्हणाले, “संगीतकार कुणाल- करण ही अतीशय टॅलेंटेड जोडी मराठी इंडस्ट्रीला मिळाली आहे‌. टायटल ट्रॅकचे गीत आणि संगीत त्यांनीच केले आहे. मला गाताना प्रचंड मजा आली. कधी एकदा टिव्हीवर मी ‘महामिनिस्टर’चं टायटल ट्रॅक पाहतोय असं मला झालं आहे.”


Back to top button
Don`t copy text!