दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२२ । सातारा । क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथे महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलासआहेर यांच्या अध्यक्षतेखाली ‘मूल्यवर्धनाद्वारे दुग्ध व्यवसायातील उत्पन्नवाढ’ या विषयावर 14 ते 20 सप्टेंबर 2022 दरम्यान राष्ट्रीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रशिक्षणामध्ये भारतामधील विविध राज्यातून एकूण 21 प्रशिक्षणार्थींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला ज्यामध्ये प्राध्यापक, शिक्षक आणि पदव्युत्तर विद्यार्थीयांचा समावेश होता. प्रशिक्षणाचे उद्घाटन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे पशुवैद्यकीय व पशुविज्ञानशाखेचे अधिष्ठाता तथा संचालक शिक्षण डॉ. शिरीष उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले. विविध संकटांनी ग्रासलेल्या दुग्ध व्यवसायातील उत्पन्न वाढवण्यासाठी मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थ तयार करण्याची निकड अधोरेखित करून सदर विषयावरील प्रशिक्षण आयोजन केल्याबद्दल डॉ. उपाध्ये यांनी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता आणि आयोजकांचे अभिनंदन केले.
उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलास आहेर यांनी भूषविले. प्रशिक्षणामध्ये दुग्ध प्रक्रिया विषयातील तज्ञांची विविध विषयावरील व्याख्याने दुरस्थ माध्यमाच्या सहाय्याने आयोजित करण्यात आली होती.
प्रशिक्षणाचा समारोप महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. अनिल भिकाने यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. डॉ. भिकाने यांनी आपल्या भाषणामध्ये दूध आणि दुग्ध पदार्थाचे मानवी आहारातील महत्त्व अधोरेखित करून दुधाबरोबरच गाई, म्हशीचे शेण आणि मूत्रयांच्या पासून देखील मूल्यवर्धित पदार्थ तयार करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. महाविद्यालयाच्या पशुजन्य पदार्थ प्रक्रिया तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. बापूराव कदम यांनी संयोजक तर विभागातील प्राध्यापक डॉ. दिपाली सकुंडे यांनी सहसंयोजक म्हणून काम पाहिले.