दैनिक स्थैर्य | दि. 18 डिसेंबर 2024 | सातारा | ग्रामीण भागातील नागरिकांना दरडोई 55 लिटर शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने जल जीवन मिशन योजना कार्यान्वीत करण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्ह्यात 1 हजार 100 कामे मंजूर असून ही कामे येत्या मार्च 2025 पर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी जल जीवन मिशन अंतर्गत कांमाचा आढावा घेतला. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जल जीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेली कामे तात्काळ ग्रामपंचायतींकडे वर्ग करा, अशा सूचना करुन जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, ज्या कामांना मंजुरी मिळाली आहे अशी कामे मार्च पर्यंत कोणत्याही स्थितीत पूर्ण करावीत. जे कंत्राटदार कामात दिरंगाई करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
ज्या कामांसाठी जागेची आवश्यकता आहे त्याचीही पुर्तता केली जाईल. तसेच जी कामे वन विभागाच्या जमिनींमध्ये येत आहे त्या कामांच्या मंजुरीची प्रक्रिया केली जाईल. विद्युत जोडणीचे प्रस्तावही सादर करण्याच्या सचूनाही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी बैठकीत केल्या.