
दैनिक स्थैर्य । 13 जुलै 2025 । सातारा । पाटण तालुक्यातील कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याचे काम पाऊस कमी झाल्यानंतर 15 डिसेंबरच्या आधी पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
दौलत नगर तालुका पाटण येथील शासकीय विश्रामगृहात कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्ग क्र. 166 इ च्या पाटण तालुक्यातील प्रलंबित कामासंदर्भात व इतर अडचणीबाबत आढावा बैठक पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, मुंबई येथील राष्ट्रीय महामार्ग प्रादेशिक कार्यालयाचे मुख्य अभियंता संतोष शेलार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल अहिरे, पाटण उपविभागाचे प्रांताधिकारी सोपान टोम्पे, पाटणचे तहसीलदार अनंत गुरव आदी उपस्थित होते.
कराड-चिपळूण राष्ट्रीय महामार्गाच्या पाटण तालुक्यातील महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे सांगून पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, कामातील विलंबामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांमध्ये तक्रारीचे वातावरण झाले आहे. ऑगस्ट महिन्याच्या मध्यावधीनंतर पावसाचे प्रमाण कमी होत असते. हे काम पाऊस कमी झाल्यानंतर तीन महिन्यात पूर्ण करावे, रस्त्याची कामे करताना नवीन नळ पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईनची कामे पाणीपुरवठा विभागाने पूर्ण करून घ्यावीत. अतिक्रमणेही काढण्यात आली आहेत उर्वरित अतिक्रमणे संबंधितांना नोटीस देऊन तात्काळ काढून घ्यावीत. या कामी महसूल व पोलीस प्रशासनाची मदत घ्यावी.
यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, महामार्गाचे काम सुरू असताना वाहतूक बंद पडू नये, पर्यायी वाहतूक सुरू राहावी, याची दक्षता घ्यावी.