पुनर्वसित गावातील जनसुविधांची कामे त्वरित पूर्ण करा – पालकमंत्री बच्चू कडू यांचे यंत्रणेला निर्देश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, अकोला, दि.१५: काटेपूर्णा बॅरेज प्रकल्पामुळे अंशतः बाधित होणाऱ्या मौजे जांभा बु. ता. मुर्तिजापूर च्या नवीन गावठाण जागेवरील भूखंडांचा ताबा प्रकल्पबाधितांना आज पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले.

पुनर्वसित गावातील जनसुविधांची कामे त्वरित पूर्ण करा, असे निर्देशही श्री.कडू यांनी यावेळी यंत्रणेला दिले. यावेळी विधान परिषद सदस्य आ. गोपीकिशन बाजोरिया, आ.अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ.नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा,  अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन सदाशिव शेलार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, कार्यकारी अभियंता काटेपूर्णा बॅरेज प्रकल्प श्रीराम हजारे यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी प्रभाकर इंगळे, रमेश बावने, रविंद्र इंगळे,श्रीमती उषाबाई गजानन इंगळे, सुमेध इंगळे, अरविंद इंगळे, निलेश भटकर इ. प्रकल्पबाधितांना भूखंड वाटप करण्यात आले. कार्यकारी अभियंता हजारे यांनी यावेळी प्रकल्पाची माहिती सादर केली. त्यात पुनर्वसित गावांमधील जनसुविधांची कामे त्वरित पूर्ण करावीत, असे निर्देश ना.कडू यांनी यावेळी दिले.

पालकांच्या तक्रारीची दखल घेऊन संबधित शाळांचे ऑडिट करा – पालकमंत्री बच्चू कडू यांचे निर्देश

पालकांनी काही शाळांबद्दल जादा शिक्षण शुल्क तसेच अन्य असुविधांबाबत तक्रारी केल्या आहेत, या तक्रारींची दखल घेऊन शिक्षण विभागाने संबधित शाळांचे लगेचच शैक्षणिक गुणवत्ता व आर्थिक लेखापरिक्षण(ऑडिट) करावे, असे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी दिले.

पालकमंत्री ना.बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शिक्षण विभागाच्या कामकाजाबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी विधान परिषद सदस्य आ.गोपीकिशन बाजोरिया, आ.अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ.नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा,  अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी माहिती देण्यात आली की, अकोला शहरातील काही शाळांबद्दल जादा शिक्षण शुल्क आकारणी, कोरोना काळात शाळा बंद असूनही विविध कारणाने शुल्क वसुली, शाळांमधून शैक्षणिक साहित्य खरेदीबाबत सक्ती, शाळा इमारत, शिक्षण बोर्डाबाबतची संलग्नता व त्यातून झालेली पालकांची फसवणूक याबाबत तक्रारी आहेत. अशा तक्रारींची प्रशासनाने स्वयंस्फूर्तीने दखल घेऊन अशा शाळांचे लेखापरीक्षण तसेच सर्व प्रकारच्या परवानग्या व बोर्ड संलग्नता तसेच आर्थिक व्यवहारांचे लेखा परीक्षण करावे, असे निर्देश श्री.कडू यांनी दिले. तसेच ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळांतून किती विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेऊ शकले, तसेच कोरोना काळात  शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीबाबतही चौकशी करण्यात यावी, असेही निर्देश श्री.कडू यांनी दिले.

 

पालकमंत्र्यांकडून दिव्यांग युवतीस संगणक व सहसाहित्याची मदत

पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी कुटासा येथील गायत्री चंद्रशेखर निहारकर या दिव्यांग युवतीस स्वयंरोजगार करण्यासाठी संगणक व सहसाहित्य देऊन मदत केली.

यावेळी विधान परिषद सदस्य आ.गोपीकिशन बाजोरिया, आ.अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ.नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा,  अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे तसेच युवतीचे कुटुंबीय उपस्थित होते. या युवतीस शासनाचे आपले सेवा केंद्र मंजूर झाले असून त्यात ह्या साहित्याचा वापर करून लोकांना सेवा उपलब्ध करून त्याद्वारे स्वयंरोजगाराची सोय झाली आहे.

 

प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुलांची कामे पूर्ण करा

पालकमंत्र्यांनी घेतला मनपाशी संबंधित विषयांचा आढावा

पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज महानगरपालिकेशी संबंधित विषयांचा आढावा घेतला.

अकोला मनपा हद्दीत प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ज्या घरांची कामे अपूर्ण आहेत व  तामत्रिक कारणांमुळे लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही, अशा तांत्रिक अडचणी त्वरित दूर करून घरकुलांची कामे पूर्ण करावीत, असे निर्देश श्री.कडू यांनी आज येथे दिले.

पालकमंत्री श्री.कडू यांच्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका संबंधीत विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी विधान परिषद सदस्य आ.गोपीकिशन बाजोरिया, आ.अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आ.नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त निमा अरोरा,  अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते.

यावेळी मनपा हद्दवाढ झाल्याने ज्या ग्रामपंचायती मनपा हद्दीत समाविष्ट झाल्या त्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे मनपा सेवेत समायोजन करण्याबाबत चर्चा झाली. या कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याबाबत सहानुभूतीने निर्णय घेऊन त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावे. यासंदर्भात ज्या बाबी वरिष्ठ पातळीवर प्रलंबित आहेत त्या प्रश्नावर मंत्रालय स्तरावर बैठक आयोजित करून निर्णय घेण्यात येईल. तसेच गुंठेवारी पद्धतीच्या भूखंडावर असलेले घरकुल प्रस्ताव लेआऊट करुन नियमानुकूलन करून प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देश श्री.कडू यांनी दिले. तसेच शहरातील व्यापारी संकुलात तसेच सार्वजनिक ठिकाणी सर्वेक्षण करुन दिव्यांग व्यक्तिंना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देशही दिले.

कृषी उत्पन्न बाजार समिती येथे गोडाऊन दुकानाचे पालकमंत्री बच्चु कडू यांच्या हस्ते लोकार्पण

अकोला,दि.14 (जिमाका)- व्यापारी व  शेतकऱ्यांच्या कृषी मालाची साठवण सुरक्षित करता यावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, मुर्तिजापूर येथे सर्व सोईसुविधायुक्त गोडाऊन दुकानांचे लोकार्पण राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते आज करण्यात आले.

यावेळी कृषी बाजार समितीचे अध्यक्ष ॲड. सुहासराव तिडके, उपसभापती गणेशराव महल्ले, खरेदी विक्री  समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध तिडके, उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते, तहसिलदार पवार, जिल्हा परिषद सदस्य संजीव नाईक, कृषी उत्पन्न समितीचे संचालक मंडळ व शेतकरी  उपस्थित होते.

तत्पूर्वी पालकमंत्री श्री.बच्चू कडू यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वृक्षरोपण करण्यात आले. नवीन गोडाऊन निर्मितीमुळे शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना कृषी माल ठेवण्यास फायदा होणार आहे. कृषी बाजार समितीव्दारे शेतकऱ्यांकरीता केलेल्या कामाचे कौतुक बच्चू कडू यांनी यावेळी केले.  शेतकऱ्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळावा, दलाल किंवा अडत्याकडून शेतकऱ्यांचे शोषण होवू नये, तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी कृषी बाजार समितीने प्रयत्न करावे.  कृषी मालावर प्रक्रिया करुन आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळण्याकरीता प्रयत्न करावे.  मुर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यातील उत्कृष्ठ  खरेदी  विक्री  केंद्र व्हावे, या करीता नियोजन करुन प्रस्ताव सादर करण्याचे सूचना बच्चू कडू यांनी यावेळी दिले.


Back to top button
Don`t copy text!