जोड कालव्याची कामे तातडीने पूर्ण करा; विशेष बैठक लावून कालव्यांच्या भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावा – पालकमंत्री शंभूराज देसाई

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑक्टोबर २०२२ । सातारा । भूसंपादना अभावी रखडलेली कालव्यांची कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी विशेष बैठक लावा. तसेच  भूसंपादनाचे प्रश्न सोडवून जोड कालव्याची कामे पूर्ण करा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये आज कालवा सल्लागार समितीची बैठक पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.  त्यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी या सूचना दिल्या.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार अनिल बाबर, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, सातारा सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता संजय डोईफोडे यांच्यासह सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

धरणांमध्ये गाळ साठल्यामुळे त्यांची क्षमता कमी होत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, हा गाळ जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाची कामे तसेच मोठे राज्यमार्ग व जिल्हा मार्गांच्या कामांसाठी भराव म्हणून वापरता येईल. त्यासाठी जिल्हाधिकारी यांनी परवाने द्यावेत व सिंचन विभागाने संबंधित बांधकाम विभागाशी संपर्क साधावा. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही संकल्पना शासन राबवतच आहे. त्यामुळे या विषयामध्ये अडचण येण्याचे कारण नाही. शंभर टक्के पाणीपट्टी वसूलीच्या दृष्टीने कार्यवाही करावी.  सिंचनाखाली येणारी जमीन आणि वसुल होणारी पाणीपट्टी यांची मोजणी करण्यासाठी खासगी संस्थेची नेमणूक करून नेमका हिशोब मांडावा, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

बैठकीमध्ये खासदार श्रीनिवास पाटील यांनी धरणांमधील गाळ काढण्याबाबत सूचना केली.  आमदार जयकुमार गोरे आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी उरमोडी धरणाच्या कालव्यातून पाण्याची आवर्तने तातडीने सुरू करण्याची मागणी केली. तर आमदार अनिल बाबर यांनी जोड कालव्यांच्या दुरुस्तीचा मुद्दा उपस्थित केला.

यावेळी सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता श्री. डोईफोडे यांनी रब्बी हंगामासाठीच्या पाणी वाटपाच्या नियोजनाचे सादरीकरण केले.


Back to top button
Don`t copy text!