दैनिक स्थैर्य । दि. 08 डिसेंबर 2021 । फलटण । सरपंच व ग्रामसेवकांनी योग्य समन्वयातून गावोगावी ग्रामविकासाच्या योजना पूर्ण कराव्यात, असे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण पंचायत समितीच्यावतीने महाअवास अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा संपन्न झाली. त्यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी फलटण – कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण, फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, उपसभापती संजय सोडमिसे, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, बाळासो ठोंबरे, संजय कापसे, सौ.रेश्मा भोसले, गटविकास अधिकारी डॉ.अमिता गावडे, सहाय्यक गटविकास अधिकारी विनायक गुळवे, जिल्हा परिषदेचे उपविभागीय उपअभियंता एस.एम.गरुड, तालुक्यातील विस्तार अधिकारी, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची कार्यशाळेस उपस्थिती होती.
श्रीमंत संजीवराजे यांनी, सरपंच, ग्रामसेवकांनी यशवंतराव चव्हाण समृद्ध ग्राम अभियानातून कामे करण्याबाबत सूचित करुन मातोश्री ग्रामसमृद्धी पानंद रस्ते यातून जास्तीत जास्त अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण करावीत. हनमंतवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सामुहीक घरकुल योजना चांगल्या पद्धतीने राबवण्यात आली असून खटकेवस्ती येथील सामुहीक घरकुल योजना प्रस्तावित आहे. ज्या लाभार्थींना स्वत:कडे मालकीची जागा नाही अशा लाभार्थ्यांना शासकीय / गावठाण जागा उपलब्ध करुन देण्यासाठी सरपंच, ग्रामसेवकांनी प्रयत्न करावेत. पंडीत दिन दयाळ योजनेंतर्गत लाभा खरेदीसाठी अनुदान उपलब्ध होण्यासाठीही प्रयत्न करावेत, अशा सूचनाही यावेळी श्रीमंत संजीवराजे यांनी केल्या.
आमदार दीपक चव्हाण म्हणाले, गावागावात यशवंत ग्रामसमृद्धी योजनेंतर्गत जास्तीत जास्त कामे घेण्यासाठी आराखडा निश्चित करावा. यातून गावाचा विकास होवून ग्रामीण राहणीमान उंचावण्यास मदत होणार आहे. यासाठी 15 वा वित्त आयोग, ग्रामनिधी आदींचा वापर करुन गावामध्ये स्थायी मत्ता निर्माण करुन गावाचा भौतिक विकासही साधता येईल असे सांगून सरपंच, ग्रामसेवकांनी प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना यातील अपूर्ण काम पूर्ण करण्याच्या सूचनाही आमदार दीपक चव्हाण यांनी यावेळी दिल्या.
डॉ.अमिता गावडे यांनी, दि.2 ऑक्टोबर 2021 ते मार्च 2022 अखेर राबविण्यात येत असलेल्या महाआवास अभियाना अंतर्गत तालुक्यामध्ये अपूर्ण असणार्या 896 घरकुलांची कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावरुन सरपंच, ग्रामसेवक यांनी नियोजन करणे आवश्यक असल्याचे सांगून यशवंतराव चव्हाण ग्रामसमृद्धी योजना, मातोश्री शेत पानंद रस्ते याबाबत माहिती दिली. यामधून घरातील प्रौढ व्यक्तींना रोजगार उपलब्ध करुन देणे, ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे व त्यांना लखपती बनविणे हे या योजनेचे उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
प्रारंभी महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. पंडीत दिन दयाळ यांच्या प्रतिमेचेही पूजन करुन दीपप्रज्वलनाने कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन विनायक गुळवे यांनी केले.