कॉफीटेबल बुक मधून उलगडले ‘समग्र रायगड’ कोकण विभागीय माहिती उपसंचालकांकडून कौतूक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । जिल्हाधिकारी कार्यालय रायगड आणि जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या “समग्र रायगड – पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण”  या कॉफीटेबल बुकचे आज विभागीय माहिती कार्यालयात घेण्यात आलेल्या कोकण विभागीय आढावा बैठकीत वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे “समग्र रायगड – पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण” या कॉफी टेबल बुकचे कालच (दि.17 ऑक्टोंबर) प्रकाशन झाले.

रायगड जिल्ह्यातील प्राचीन लेणी, गड किल्ले, समुद्रकिनारे, वॉटर स्पोर्ट्स, धरणे, बंदरे, धबधबे-गिरीस्थाने, अभयारण्य, ऐतिहासिक-धार्मिक स्थळे अशा पर्यटन स्थळांसोबतच उद्योग-कारखाने, स्थानिकांच्या सक्षमीकरणासाठी नाविन्यपूर्ण योजना, पर्यटकांसाठी मार्गदर्शक नकाशे, अशा उपयुक्त माहितीचे संकलन या कॉफीटेबल बुकमध्ये करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा प्रभारी विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून हे कॉफीटेबल बुक तयार करण्यात आले असून  जिल्हा नियोजन अधिकारी जयसिंग मेहेत्रे, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, मीडिया आर अँड डीचे दिलीप कवळी यांनी हे कॉफीटेबल बुक तयार करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आहेत.

कोकण विभागीय उपसंचालक डॉ. गणेश मुळे यांनी “समग्र रायगड – पर्यटन, पर्यावरण, सक्षमीकरण” या कॉफी टेबल बुकचे विशेष कौतुक करीत जिल्हा माहती अधिकारी मनोज सानप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

यावेळी रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, पालघर जिल्ह्याचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव, ठाणे जिल्ह्याचे प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी नंदकुमार वाघमारे, उपसंपादक प्रविण डोंगरदिवे आणि कोकण विभागातील कर्मचारी उपस्थित होते. डॉ. गणेश मुळे यांनी यावेळी विभागातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.


Back to top button
Don`t copy text!