दैनिक स्थैर्य | दि. ६ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण नगर परिषदेच्या डॉ. बाबासाहेब आंबडेकर शाळेच्या मैदानावर नगर परिषदेकडून बांधण्यात येणार्या कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या विरोधात सामाजिक कार्यकर्ता नंदकुमार मोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केली आहे व हे बांधकाम थांबवावे, अशी मागणी केली आहे.
पंतप्रधानांकडे केलेल्या तक्रारीत मोरे यांनी म्हटले आहे की, आपल्या देशात ‘शिक्षक दिन’ मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. आपल्यालाही शिक्षक दिनाच्या शुभेच्छा! मात्र, शिक्षणासारख्या पवित्र कामाला गालबोट लावणारे काम सध्या फलटण नगर परिषदेकडून होत आहे. माढा लोकसभा मतदारसंघात येणार्या फलटण नगरपरिषदेच्या सरकारी शाळेच्या खेळाच्या मैदानावर कमर्शियल कॉम्प्लेक्स उभे करण्याचे मोठे षड्यंत्र केले जात आहे. या शाळेत गोरगरीबांची मुले शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी असलेल्या शाळेच्या खेळाच्या मैदानावर सध्या नगर परिषदेकडून कमर्शियल कॉम्प्लेक्स निर्माण केले जात आहे. हे काम आपण थांबवावे, अशी माझी मागणी आहे. महाराष्ट्रातील सरकार आपल्या विचारांचे आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्र सरकारला हे काम थांबविण्यासाठी सूचना द्याव्यात, ही विनंती.
तसेच या शाळेचे नाव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा असे असताना तेही नाव बदलण्याचे षड्यंत्र सध्या काही लोकांकडून सुरू आहे. त्याबाबतीतही आपण दखल घ्यावी, अशी माझी मागणी आहे, असे नंदकुमार मोरे यांनी म्हटले आहे.