स्थैर्य, सातारा, दि.३ : पोलिसांनी दरोड्याला मदत व बेकायदा डांबून ठेवून अधिकाऱ्याला पाठीशी घातल्याचा आरोप करत बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी तत्कालीन सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याविरोधात राज्य पोलीस प्राधिकरणाकडे चोरगे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने सेवानिवृत्त न्यायमूर्ती श्रीहरी डावरे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर १४ जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, राजेंद्र चोरगे हे गुरूकूल शाळेचे चेअरमन असून, या शाळेचा ताबा घेण्यावरून वाद होता. २०१७ मध्ये त्यांच्या विरोधात एका व्यक्तीने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या अनुषंगाने सातारा शहर पोलीस ठाण्यात सात महिने चौकशी सुरू होती. परंतु त्यात तथ्य नसल्याचे त्यांना पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, एके दिवशी दुपारी स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले.
चोरगेंच्या म्हणण्यानुसार त्यांना बराचवेळ बसवून मानसिक त्रास दिला. त्यांना अटक करणार आहे, असे सांगून सिव्हिलमध्ये मेडिकलला पाठवले. याचदरम्यान त्यांच्या विरोधकांनी गुरूकूल शाळेचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. शाळेतील पैसेही घेतले आणि लुटमारही केली. सोडून द्यायचे म्हणून वारंवार ब्लॅकमेल आणि पोलिसांनी पैसे घेतल्याचा आरोपही चोरगे यांनी केला होता. त्यानंतर सहायक फौजदार शिर्के यांना निलंबित करण्यात आले. मात्र, तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी घनवट यांना पाठीशी घातल्याचा आरोप त्यांनी केला होता. यासंदर्भात चोरगे यांनी मुंबई येथील राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने १४ जानेवारीला सुनावणी होणार आहे. या सुनावणीला चोरगे यांना तक्रार अर्जासह हजर राहाण्याचे नोटीस बजावण्यात आले आहे.