स्थैर्य, फलटण : प्रेमविवाह करणार्या मुलीने आपले वडील व आणखी एक जणाविरोधात लोणंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीला व तिच्या पतीला शारीरिक व मानसिक त्रास दिला जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी व आम्हाला संरक्षण द्यावे अशी तक्रार करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, फलटण तालुक्यातील एका गावातील मुलीने दि. 5 ऑगस्ट 2020 रोजी एका मुलाशी कायदेशीर प्रेमविवाह केला आहे. या विवाहाला वडिलांची संमती नसल्याने या नवविवाहित दांपत्याला शारीरिक व मानसिक त्रास दिला जात आहे. हा त्रास थांबला नाही तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असा इशाराही या मुलींने तक्रार अर्जाद्वारे दिला आहे.
याबाबत संबंधित मुलीने लोणंद पोलीस स्टेशन यांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि.5 ऑगस्ट रोजी कायदेशीर प्रेमविवाह केला असून तसा जबाब आपल्या पोलीस स्टेशनमध्ये येऊन नोंदवला आहे. तरीही माझे वडील आणि एक व्यक्ती हे दोघे जण माझे पती व मला वारंवार शारीरिक व मानसिक छळ करून आमच्या जीवितास धोका निर्माण करत आहेत. तरी आमच्या दोघांच्या जीविताची बरेवाईट झाल्यास त्यास पूर्णपणे माझे वडील व आणखी एक जण हे जबाबदार असतील.
तरी आपण सदर व्यक्तीवर योग्य ती कारवाई करावी व व आमचे त्या व्यक्तींपासून संरक्षण करावे अन्यथा आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. तरी आम्हाला न्याय मिळावा असेही या तक्रारीमध्ये म्हटले आहे.