स्थैर्य, दहिवडी, दि.११: माणच्या तहसीलदार बाई माने यांनी शनिवारी (दि 10) प्रसिद्धी पत्रकाद्वारे महिला अधिकार्यांची बदनामी करीत असलेल्या आरोपाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी केलेल्या आरोपांचे खंडन केले. मी तर अधिकार्यांनी केलेल्या कारनाम्यांचा पाढा वाचून तक्रार त्यांच्या वरिष्ठांकडे केली असून, यात कसली बदनामी केली आहे. याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणाव्या लागतील. सर्वसामान्य जनतेसाठी दाद मागितली याला, हे अधिकारी बदनामीचे गोंडस नाव देऊ लागले आहेत, त्या अनुषंगाने भविष्यात महिला आयोग व योग्य न्यायालयात दाद मागणार मागणार असल्याच्या भमक्या देणे हे अधिकारीपदाला शोभनीय नाही तर या धमक्यांना भीक घालणार नाही, असा घणाघाती आरोप संजय भोसले यांनी केला आहे.
भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, वाळू वाहतूक करणारा ट्रक क्र. (एमएच 11 एएल 5328) हे वाहन मंडलाधिकारी तलाठी यांच्या अवहालानुसार तहसील कार्यालयासमोरील पोलीस कवायत मैदानात जमा केल्याचा स्पष्ट उल्लेख असून सदरचे वाहन 23 मे 2020 चे सात ते आठ दिवसांनंतर दिसून येत नसल्याची माहिती मिळल्यानंतर मी स्वतः व माझ्यासोबत काही पत्रकारांनी सदरच्या जागेचे व्हिडिओ चित्रीकरण केलेले आहे. या सर्व पुराव्यानिशी दि. 8 आक्टोबर 2020 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. जर का अधिकार्यांनी जप्त केलेले वाहन त्यांच्याच अवहालानुसार त्याच जागी दिसून येत नसल्याने ते वाहन गेले कुठे, याला अपुरी माहिती कशी म्हणता येईल.
संबंधित व जागेवर नसलेल्या वाहनावर कारवाई सुरू असल्याचा बाई माने यांचा खुलासा हा सर्व सामान्यांना चक्रावून टाकणारा व खोटारडा असताना सदरील वाहनावर कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नक्की त्यांनी कोणावर कशी, कोणती कारवाई केली हे त्यांनी स्पष्टपणे जाहीर करावे. अन्यथा गेली तीन महिने कारवाई झाली नसल्याचे सबळ पुरावे जिल्हाधिकार्यांना सादर करण्यास तयार आहे तसेच तहसीलदार यांनी माझी बदली झाल्यानंतर बदनामी सुरू केली असल्याचा केलेला आरोप धादांत खोटा आहे, तर मी चारा छावणी घोटाळा, त्यातील घेतलेली टक्केवारी व अवैध वाळू उपसा व वाहतूक या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार माण यांच्याविरोधात गेली अनेक महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे लेखी तक्रारी दाखल केलेल्या आहेत. याचा बाई माने यांना विसर पडला असावा.
तरी यांच्या धमक्यांना बळी न पडता अथवा भीक न घालता मी माझी अंतिम क्षणी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढाई सुरू ठेवणार आहे. या अनुषंगाने मुंबई येथील उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत आहे, असे संजय भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे.