स्थैर्य, औरंगाबाद, दि.१२: राज्यातील सर्व विद्यापीठांतर्गत असलेल्या वरिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागातर्फे देण्यात आले आहेत. या केंद्राची स्थापना करून तत्काळ समन्वयकाची नियुक्तीही करावी, असे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी सर्व संलग्नित महाविद्यालयांनी केंद्र स्थापन करण्यात येणार अाहे.
महाविद्यालयात सेट-नेटसह विविध पात्रता परीक्षा तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश, एमफिल, पीएचडी प्रवेशपूर्व परीक्षा, यूपीएससी, एमपीएसी, बँकिंग आदींसह केंद्र व राज्य शासनाच्या विविध पदांसाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण व्हावी म्हणून धोरण आखले आहे.
याविषयी उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. दिगंबर गायकवाड यांनी विद्यापीठ प्रशासनाला पत्राद्वारे कळवले आहे. शैक्षणिक विभागाचे उपकुलसचिव आय. आर. मंझा यांनी परिपत्रक जारी केले. प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ यांच्या आदेशानुसार विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्व संलग्नित अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वायत्त, शासकीय, स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र तातडीने स्थापन करून मार्गदर्शन केंद्रावर अनुभवी व माहितीगार अध्यापकाची नियुक्ती समन्वयक म्हणून करावी, असे अादेश दिले अाहेत.