दैनिक स्थैर्य । दि. २७ फेब्रुवारी २०२३ । सातारा । खासदार उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी गेल्या पाच वर्षात सातारा पालिका अक्षरश: लुटून खाल्ली. त्यांच्या नगरसेवकांत तुला जास्त मिळतंय की मला अशी स्पर्धा लागली होती, अशी जहरी टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीवर केली आहे.
सातारा पालिकेत बैठकीनंतर आमदार भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, पालिकेच्या निवडणुकीत खासदार साहेबांनी साातारकरांना अनेक प्रकल्पांचे आश्वासन दिले पण प्रकल्प पूर्ण झालेच नाही . सातारकराचे स्वप्नभंग झाले आहे. नगराध्यक्षांना काम करण्याची मुभा नव्हती, स्वातंत्र्य नव्हते. सर्वसामान्य घरातील स्त्री या नावाखाली नगराध्यक्षांना पालिकेत काम करण्याची संधी देणार असे त्यांनी सांगून उमेदवारी दिली होती. त्यातूनच त्यांना सातारकरांनी निवडून दिले. पण, गेल्या पाच वर्षात नुसते खाणे या पलिकडे काहीही झाले नाही. अख्खी नगरपालिका पाच वर्षात सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी लुटून खाल्ली आहे. उलट त्यांच्यात शर्यत लागली होती की तुला जास्त मिळतंय की मला. गेल्या पाच वर्षात पालिका कोणताही मोठा प्रकल्प राबवू शकली नाही. तसेच कोणताही प्रकल्प पूर्ण करु शकली नाही. ही कामे देताना ठेकेदारांकडून व कंपन्यांकडून आधीच पैसे घेतले होते. त्यामुळे त्यांचे कोणीही ऐकायला तयार नाहीत, असा टोलाही शिवेंद्रसिंहराजेंनी लगावला आहे.
फ्लेक्सबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयाची सातारा पालिकेने अंमलबजावणी करावी. माझ्या वाढदिनीही परवानगी घेऊनच फ्लेक्स लावले जातील, असे त्यांनी सांगितले.