
दैनिक स्थैर्य । 19 मार्च 2025। फलटण । विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये शिक्षक पालक व विद्यार्थी यांच्यातील संवादा महत्त्वाचा आहे. इयत्ता बारावीपर्यंत पालक विद्यार्थ्यांच्याकडे लक्ष देतात तथापि कॉलेजला विद्यार्थी गेल्यानंतर मात्र पालक आणि पाल्य यांच्यातील संवाद कमी होतो. विद्यार्थी चुकीच्या संगतीला जाऊन विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते. यासाठी पालकांनी रोज संवाद ठेवला पाहिजे. पाल्य, पालक, शिक्षक यांच्यामध्ये जेव्हा संवाद असतो तेव्हा विद्यार्थी निश्चितपणे चांगले करिअर करतो. त्यासाठी पालकांनी जागरूक असणे गरजेचे आहे, प्रतिपादन मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी केले. ते रसायनशास्त्र विभागाच्या पालक मेळाव्यात अध्यक्ष म्हणून बोलत होते.
याप्रसंगी डॉ. टी. पी. शिंदे, रसायनशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. ए. पी. आचार्य, विज्ञान शाखाप्रमुख डॉ. मोनाली पाटील आदी प्राध्यापक उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. कदम म्हणाले, विद्यार्थी, शिक्षक, पालक असा शिक्षणामध्ये त्रिकोणी संगम आहे स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी काळाच्या गरजा ओळखून उच्च शिक्षण घेतले तर त्यांना भावी आयुष्यात योग्य मार्ग सापडेल.
डॉ. मोनाली पाटील म्हणाल्या, विद्यार्थी पालक शिक्षक यांनी एकमेकांशी संवाद साधावा. पालकाने पाल्याकडे विशेष लक्ष द्यावे.
पालक प्रतिनिधी अरुण घनवट यांनी विद्यार्थ्यांनी आपली संगत काय परिणाम करते यावर विचार करावा असे मत मांडले.
प्राजक्ता बनसोडे, पूजा धायगुडे, शिवांजली पोळ, शिवानी जगदाळे, या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. प्रा.डॉ. ए. पी. आचार्य यांनी प्रास्ताविक केले. प्रा. ज्योती काळेल यांनी सूत्रसंचालन केले व प्रा. अनुप गोडसे यांनी आभार मानले.
याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांची उपस्थित होते.