स्थैर्य, मुंबई दि.27 : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला जावा. त्यासाठी विधिमंडळ सदस्यांची समिती तयार करावी अशी सूचना विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केली.
वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन आणि मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृश्य प्रणालीद्वारे (वेबिनार) परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
ना.श्रीमंत रामराजे पुढे म्हणाले, मराठी भाषा मंत्री यांनी पुढाकार घेऊन माननीय पंतप्रधान यांची भेटीची वेळ घ्यावी. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी नेमलेल्या सदस्यांचे शिष्टमंडळ केंद्रात घेऊन जावे. मराठी भाषेला मान सन्मान मिळवून देण्यासाठी सर्वपक्षीय सदस्यांनी सहकार्य करावे असेही ते म्हणाले.
या वेबीनारमध्ये राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, विधिमंडळ मराठी भाषा समितीचे प्रमुख चेतन तुपे यांच्यासह इतर मान्यवरांनी सहभाग घेतला.