
स्थैर्य, सोलापूर, दि.4 : सोलापूर शहरासाठी तीन तज्ञ डॉक्टरांची नियुक्त समिती आली असून तीन आठवडे थांबणार आहे. सोलापुरातील कोरोनाबाधित रूग्णांसाठी उपचार पद्धती निश्चित करणार आहे.
राज्य शासनाच्या सुचनेनुसार वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे संचालक डॉ. तात्यासाहेब लहाने यांनी समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून पुण्याच्या बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रा. डॉ. शशिकला सांगळे, सदस्य म्हणून लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. व्यंकटेश जोशी आणि नांदेडच्या श्री. शं.च. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्रा. डॉ. विजय कापसे यांचा समावेश आहे. समितीमधील डॉक्टर औषधवैद्यकशास्त्र, बधिकरणशास्त्र आणि छाती व क्षयरोगशास्त्राचे तज्ञ आहेत. ही समिती सोलापूर येथील कोविड-19 च्या परिस्थितीचा आढावा घेऊन वाढत्या मृत्यूदराची समिक्षा करणार आहे. कोविड रूग्ण असणाऱ्या दवाखान्यांना भेटी देऊन उपचार पद्धतीची माहिती घेणार असून ते योग्य प्रमाणित उपचार पद्धती निश्चित करणार आहेत. ही समिती तीन आठवडे शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि कोविड रूग्णालयांना भेटी देणार आहेत.