वडूज ग्रामीण रुग्णालयाच्या तीन डॉक्टरांच्या चौकशीसाठी समिती गठीत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 12 : वडूज येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी नोंदणी करूनही संबंधित महिलेला दाखल करून न घेता तिला सातारा येथील जिल्हा रुग्णालयात पाठवणार्‍या ग्रामीण रुग्णालयाच्या तीन डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी त्रिस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय आज सातारा जिल्हा परिषदेच्या सभेमध्ये घेण्यात आला. दरम्यान, पाटण येथील कृषी अधिकारी पदाधिकार्‍यांना विश्‍वासात न घेता बियाण्यांचे वाटप करीत असल्याचा आरोपही या सभेमध्ये करण्यात आला. कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सोशल डिस्टन्स या पार्श्‍वभूमीवर सातारा जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सभा घेण्यात आली.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, अर्थ व शिक्षण समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, कृषी सभापती मंगेश धुमाळ, समाज कल्याण सभापती कल्पना खाडे, महिला व बालकल्याण सभापती सोनाली पोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय भागवत, सचिव मनोज जाधव यांच्या उपस्थितीत आज सातारा जिल्हा परिषदेत सभा झाली.

प्रारंभीच प्रदीप विधाते यांनी वडूज ग्रामीण रुग्णालयातील कारभाराचा पाढा वाचला. ते म्हणाले,  वडूज येथील एका महिलेने प्रसूतीसाठी ग्रामीण रुग्णालयात नोंदणी केली होती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असल्यामुळे तेथे स्त्री रोग तज्ञ म्हणून काम करणार्‍या महिला डॉ. कुंभार यांनी त्या महिलेची प्रसूती करण्यास नकार दिला. मुळात त्या महिलेने नोंदणी केली असल्यामुळे तिची प्रसूती त्या ठिकाणी करणे क्रमप्राप्त होते. असे असतानाही तिला त्या ठिकाणी दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. उलट त्या महिलेला दुसरे डॉ. मदने यांनी सातारा जिल्हा रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल होण्याच्या सूचना केल्या. ती महिला भटक्या कुटुंबातील असून अशिक्षित आहे. रात्रीच्या वेळी तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सूचना दिल्यामुळे तिच्या नातेवाइकांनी तिला एका वाहनातून जिल्हा रुग्णालयात घेऊन जात असताना पुसेगाव येथे तिला प्रसूती कळा येऊ लागल्यामुळे तेथीलच एका खासगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. तत्पूर्वी काही वेळापूर्वीच मी स्वतः रुग्णालयातील डॉ. माने यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी तो टाळला.

त्या महिलेने पुसेगाव येथील एका खासगी रुग्णालयात दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. या घटनेनंतर झालेल्या सातारा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत माने, कुंभार आणि मदने या तीन डॉक्टरांवर कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक यांना अहवाल सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या. मात्र त्यांनी या प्रकरणी वडूज ग्रामीण रुग्णालयाचा कोणताही दोष नसल्याचा अभिप्राय दिला. मुळात डॉ. माने यांच्याकडूनच तसा अभिप्राय, अहवाल घेण्यात आला होता. जिल्हा शल्यचिकित्सक यांनी या तिनही डॉक्टरांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप प्रदीप विधाते यांनी यावेळी केला.

मुळात त्या महिलेच्या नातेवाइकांचे जबाब घेणे अपेक्षित असताना तसे घडले नाही. माने आणि मदने या डॉक्टरांनी त्या महिलेकडे जाऊन एका कागदावर सही घेण्यात आली. संबंधित महिलेच्या पतीच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी तो कागद आपल्या ताब्यात घेतला. या घटनेनंतर झालेला खर्च व मानसिक त्रासाची भरपाई करून देऊ असे त्यांना सांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या सभेत प्रदीप विधाते यांनी या प्रकरणाला वाचा फोडल्यानंतर या तीनही डॉक्टरांची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि आरोग्य समितीचा एक सदस्य यांचा समितीमध्ये समावेश करण्यात आला असून चौकशीमध्ये तीनही डॉक्टर दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय सभेमध्ये घेण्यात आला.

कृषी विभागाच्या आढावादरम्यान बापूसाहेब जाधव यांनी पाटण तालुक्यातील कृषी विभागाच्या अधिकार्‍यांवर शरसंधान साधले. पाटण पंचायत समितीकडे सोयाबीन आणि भाताचे बियाणे किती आले  अशी विचारणा करत बियाणे वाटप करताना जिल्हा परिषद सदस्यांना विश्‍वासात घेतले जात नाही, असा आरोप करून आकडेवारी सादर करण्याची मागणी केली. पदाधिकार्‍यांना विश्‍वासात न घेणार्‍या कृषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. त्यावर उदय कबुले यांनी असा काही प्रकार घडला असल्यास दोषी अधिकार्‍यांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली. विजय पवार म्हणाले, पाटण तालुक्यासाठी साडेपाच लाख रुपयांचे बियाणे उपलब्ध करून द्यावे. यापूर्वी विभागवार न्याय मिळाला नसल्यामुळे तो मिळण्यास मदत होईल. शिक्षण विभागाच्या आढाव्यात विजय पवार यांनी 15 जूनला प्राथमिक शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला आहे किंवा होता असे समजते. मात्र शाळा सुरू करण्यापूर्वी वर्गखोल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊनच शाळा सुरू करण्यात याव्यात असे सांगितले. दोन टप्प्यात शाळा सुरू करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. वादळी वारे, पाऊस यामुळे लोणंद शाळेवरील पत्रे उडून मोठे नुकसान झाले आहे. त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. त्यावर मानसिंगराव जगदाळे म्हणाले, ज्या शाळांचे नुकसान झाले आहे, त्यांचे सर्वेक्षण आणि पंचनामे करून त्या बाबतची माहिती शिक्षण विभागाला कळविण्याची सूचना गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आली आहे. त्यावर कार्यवाही सुरू आहे. शिक्षकांना कायम करण्याचा मुद्दा सुरेंद्र गुदगे यांनी उपस्थित केला. त्यावर अधिकार्‍यांनी तालुक्याकडून प्रस्ताव मागविण्यात आले असल्याचे सांगितले. गेल्या मासिक सभेमध्ये प्रतापसिंह हायस्कूलचा विषय तहकूब करण्यात आला होता याची आठवण करून देत संजीवराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, रयत शिक्षण संस्थेची मदत घेऊन प्रतापसिंह हायस्कूल सुरू करण्यात यावे. त्यावर अर्चना देशमुख यांनी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात यावा अशी सूचना केली.

भमिराव पाटील यावेळी म्हणाले, दुष्काळी तालुक्यांमध्ये अनुदाना संदर्भात पाठीमागील सभेत चर्चा झाली होती. शिक्षण विभागाला मिळणार्‍या या अतिरिक्त निधीचा वापर त्या ठिकाणी करण्यात यावा असा निर्णय झाला होता. त्याचे पुढे काय झाले. यावर खुलासा करताना दुष्काळी तालुक्यांना 25 ऐवजी 35 लाख रुपये अनुदान मंजूर केले असल्याचे शासकीय अधिकार्‍यांनी पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वैद्यकीय अधिकारी, नर्सेस यांच्याबरोबरच अंगणवाडी सेविका, आशा, आरोग्य कर्मचारी हे फार उत्कृष्ट काम करत आहेत. त्यांना घरोघरी जाऊन सर्वे करावा लागत असल्यामुळे त्यांना सुरक्षा कीटचे वाटप करण्यात यावे अशी मागणी विजय पवार यांनी केली.

चर्चेमध्ये उदय कबुले, प्रदीप विधाते,भारती पोळ, सुरेंद्र गुदगे, भीमराव पाटील, सरिता इंदलकर आदींनी सहभाग घेतला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!