
स्थैर्य, फलटण, दि. १ जानेवारी : शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ तळागळातील रुग्णांना मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि वैद्यकीय संस्थांनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. आरोग्य क्षेत्रात काम करताना नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचे सहकार्य मोलाचे ठरेल, असे प्रतिपादन डॉ. जे. टी. पोळ यांनी केले.
येथील कृष्णामाई मेडिकल ट्रस्ट संचलित निकोप हॉस्पिटलच्या वतीने नवनिर्वाचित नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा आणि सौ. रुपालीताई सस्ते यांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. या प्रसंगी डॉ. पोळ बोलत होते.
यावेळी बोलताना डॉ. जे. टी. पोळ म्हणाले की, “शासनाच्या माध्यमातून आरोग्यासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. मात्र, अज्ञानामुळे गरजू रुग्ण यापासून वंचित राहतात. या योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी दोन्ही नगरसेविकांचे सहकार्य लाभावे, अशी अपेक्षा आहे.”
सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित नगरसेविका कु. सिद्धाली शहा म्हणाल्या की, “आरोग्य ही प्रत्येकाची प्राथमिकता आहे. निकोप हॉस्पिटलने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. आता लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना, शासनाच्या आरोग्याशी निगडित असलेल्या सर्व कल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी १०० टक्के प्रयत्न करेन. कोणत्याही रुग्णाला उपचाराविना राहावे लागणार नाही, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
या कार्यक्रमास अमोल सस्ते, डॉ. सौ. सुनीता जे. पोळ तसेच निकोप हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टर, परिचारिका आणि प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत खेळीमेळीचे आणि उत्साहवर्धक होते.

