शेतकरी, कष्टकरी, सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास; विकास कामांमध्ये सामान्यांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ ऑक्टोबर २०२२ । मुंबई । शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित- शोषित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असून तो पुर्ण करण्यासाठी आम्ही एकजूटीनं प्रयत्न करतोय. प्रत्येकाच्या मनातलं हे आपलं सरकार आहे. त्यानुसार आमची वाटचाल सुरू असल्याचे सांगत आता सगळ्याच क्षेत्रांत, आघाड्यांवर विकास कामांचा धडाका सुरू आहे. कृषी, सिंचन, पायाभूत सुविधा, उद्योग, पर्यटन, आरोग्य आणि शिक्षण अशा बहुतेक सर्वच क्षेत्रांतील कामांनी गती घेतली आहे. विकास कामे, योजना, प्रकल्पांमध्ये सामान्यांच्या आशा- आकांक्षा यांचं प्रतिबिंब उमटेल यावर भर असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पाडवा आणि भाऊबीजेच्या दिवशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राज्यातील जनतेला दीपोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, विकास कामांना गती आली आहे. थांबलेलं चक्र पुन्हा वेगानं फिरू लागलं आहे. आपल्या सगळ्यांचा आत्मविश्वास वाढलाय. परिस्थिती बदलत आहे. महाराष्ट्राकडे सगळेच आशेनं आणि विश्वासानं पाहू लागले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील मरगळ झटकली जात असल्याने सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळतोय.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही हे पाऊल टाकत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शेतकरी कष्टकरी कामगार वंचित शोषित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्ही एकजुटीने प्रयत्न करीत आहोत. नैसर्गिक आपत्ती आली त्याने आपण डगमगलो नाही. त्यामुळं काही चांगल्या योजना राबवण्यासाठी प्रय़त्न सुरु केला आणि त्या यशस्वी होत आहेत याचं समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत एसटी बस प्रवासाची योजना सुरू केली 52 दिवसांमध्ये या योजनेचा एक कोटी पेक्षा अधिक ज्येष्ठांनी लाभ घेतला. दिवाळीसाठी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ केवळ १०० रुपयात दिला त्याचा ७ कोटी लोकांना लाभ होत असून. अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना मदतीच्या दुप्पट नुकसान भरपाई देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला त्यामध्ये जवळपास 30 लाख शेतकऱ्यांना चार हजार कोटींची मदत देण्यात आली आहे. निकषांमध्ये न बसणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा 755 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. भूविकास बँकेचे कर्ज घेतलेल्या सुमारे 35 हजार शेतकऱ्यांना 950 कोटींची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय देखील घेतल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याच निर्णय घेऊन एकाच वेळी सुमारे सात लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 2500 कोटी रुपये जमा झाले.

पोलीस भरतीला देखील आम्ही सुरुवात केली आहे 20 हजार पोलीस शिपायांची पद भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचबरोबर विविध विभागातील 75 हजार पदांची भरती लवकर सुरू करण्याचे देखील प्रक्रिया सुरू झालेली आहे. पोलिसांच्या घरांच्या किमती 50 लाखावरून पंधरा लाखावर आणल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारतानाच आरोग्यासाठी देखील दुप्पट निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात 700 बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करत असून माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. त्यासाठी वाहतूक आणि औषध खर्चापोटी प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. लवकरच या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र ते गोवा असा नवा ‘इकॉनॉमिकल कॉरिडॉर’ विकसित करण्यात येत आहे. मुंबईतल्या प्रकल्पांना गती देण्यासाठी 60 हजार कोटी रुपयांचा कर्ज उभारण्यास परवानगी दिलेली आहे. मुंबई, नागपूर, पुणे मेट्रोची कामे वेगाने सुरु आहे. मुंबईत ३३७ कि.मी. लांबीचे मेट्रो मार्गांची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर होईल लोकांना मोठा दिलासा मिळेल.

केंद्राच्या नीती आयोगाप्रमाणे राज्यांमध्ये मित्र ही संस्था आपण स्थापन केली आहे त्यामुळे राज्याचा विकास वेगाने होईल पायाभूत सुविधांच्या महत्त्वाच्या कामांना वेग देण्यासाठी मुख्यमंत्री वॉर रूममधून त्याचे संनियंत्रण केले जात आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई मध्ये वाहतूक कोंडी कमी करण्यावर विशेष लक्ष पुरविण्यात येत आहे. इतर आवश्यक पायाभूत सुविधांना वेग आला आहे. सगळ्या क्षेत्रात, आघाड्यांवर विकास कामाचा धडाका सुरू आहे. कुठलेही काम थांबवले नाही. वित्तीय बाबीं तपासून अनेक कामांना परवानगी तात्काळ दिल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले.

कृषी सिंचन पायाभूत सुविधा उद्योग पर्यटन आरोग्य आणि शिक्षण अशा बहुतेक सर्व क्षेत्रातील कामांना आम्ही गती देतोय विकास कामे योजना प्रकल्प यामध्ये सर्व सामान्यांच्या अशा आकांक्षा यांचा प्रतिबिंब उमटेल यावर आमचा भर आहे. विदेशी गुंतवणूक आणि व्यापार – उद्योग, पायाभूत सुविधांच्या विकासात आपला महाराष्ट्र अग्रेसर आहे. तो देशाच्या विकासाची पताका जगात फडकवत ठेवेल ही आमची मनोकामना आहे. यासाठी आम्ही सर्वांनी एकजूट केली आहे. त्याला आपण साथ देत आहातच. ही साथ कायम राहील. हे नातं घट्ट आणि बळकट होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

जनतेच्या मनातील प्रश्न, अडीअडचणी आणि भावना समजून घेऊन पुढे जाणारं आमचं सरकार असून त्यासाठी अहोरात्र काम करण्याची, जनतेत जाऊन, त्यांना सोबत घेऊन काम करण्याची आमची तयारी असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!