दैनिक स्थैर्य । दि. ०७ मे २०२२ । फलटण । सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचा आदेश दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आता लगबग सुरू केली आहे. त्यानुसार प्रभाग रचनेच्या पहिल्या टप्प्यासाठीचे काम सुरू झाले आहे. या निवडणुका सप्टेंबरमध्ये होण्याचे बोलले जात आहे. प्रत्यक्षात निवडणूक आयोगाची तयारी पाहता त्या लवकरच होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे.
राज्यात 25 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांसाठीची प्रभागरचना रखडलेली आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी कार्यालयांना पत्र पाठवून प्रभागरचना मागवून घेतली आहे. त्यासाठी येत्या काही दिवसात जिल्हानिहाय बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.
या संदर्भात निवडणूक आयोगाने पाठविलेल्या पत्रात १० मार्च २०२२ रोजी असलेली प्रभाग रचनेची कार्यवाही ज्या टप्प्यावर होती तेथपासून पुढे आयोगाने कार्यवाही चालू ठेवावी, असा आदेश न्यायालयाने दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रभाग रचनेच्या कामकाजावर पुढीलप्रमाणे कार्यवाही होणार आहे.
नकाशे गुगल नकाशावर सुपर इंपोज करणे, जनगणनेची आकडेवारी लिंक करणे या कामकाजाकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रभाग रचनेचे कामकाज हाताळणारे एक अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक ती सर्व कागदपत्रे तसेच जनगणनेची आकडेवारी, निवडणूक विभाग / निर्वाचक गणाची गावनिहाय आकडेवारी आणि नकाशे सॉफ्ट कॉपीसह आयोगाच्या कार्यालयात बोलविण्यात आले आहे.
नगरपरिषदेच्या प्रारूप प्रभाग रचना
कोरोनाच्या व ओबीसी आरक्षणाच्या प्राश्वभुमीवर प्रलंबित राहिलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम राज्य निवडणुक आयोगाने काही दिवसांपूर्वी जाहीर केलेला आहे. त्यानंरत राज्य सरकारने केलेल्या निर्णयामुळे पालिका निवडणूक पुन्हा लांबणीवर जात असल्याचे चित्र तयार झालेले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश दिल्याने पुन्हा निवडणुका जाहीर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानुसार जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर मंगळवार दि. १० मे ते शनिवार दि. १४ मे पर्यंत हरकती व सूचना दाखल करायच्या आहेत.