सोलापुरात नियोजनबध्द् पध्दतीने लसीकरणास सुरुवात


सोलापूर, दि. १६ : कोविड-19 विषाणूच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठीच्या कोविड लसीकरणास आज जिल्ह्यात ११ केंद्रावर नियोजनबध्द पध्दतीने सुरुवात झाली.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात आठ आणि शहरात तीन ‍ ठिकाणी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास लसीकरणास सुरुवात झाली.  लसीकरणासाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य यंत्रणा, महानगरपालिका, सोलापूर जिल्हापरिषद आणि पोलीस विभाग यांनी अतिशय काटेकोर नियोजन केले होते.  जिल्हाधिकारी  मिलिंद शंभरकर यांनी लसीकरणापुर्वी शहरातील  श्री. शिवाजी  छत्रपती सर्वोपचार रुग्णालय (सिव्हील हॉस्पिटल) आणि आश्विनी सहकारी रुग्णालयास भेट देऊन तयारीची पाहणी केली.  पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनीही भेट देऊन पाहणी केली.   अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, डॉ. प्रसाद, डॉ. राजेश चौगुले यांनी लसीकरणाच्या तयारीची माहिती दिली.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी अक्कलकोट येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणाच्या तयारीची पाहणी केली.  त्यांनतर त्यांच्याच उपस्थितीत लसीकरणास सुरुवात झाली.  यावेळी सहाय्यक आरोग्य अधिकारी  डॉ. सोनिया बगाडे उपस्थित होत्या.  कुंभारी येथील आश्‍विनी ग्रामीण रुग्णालयात लसीकरणास सुरुवात झाली.  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. माधवी रायते यांच्या उपस्थितीत लसीकरणास सुरुवात झाली.

सहाय्यक अधिष्ठाता डॉ. अगरवाल यांनी घेतली लस

शासकीय रुग्णालयात डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उपअधिष्ठाता डॉ. पुष्पा अग्रवाल यांनी पहिली लस घेतली. त्यांना लस देताच उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले.  लस देण्यात आलेल्यांचे तापमान तपासून, ओळखपत्राची खातरजमा करून आत सोडण्यात येत होते. संबंधित व्यक्तीला टोकन देऊन त्यावर आत आलेली वेळ, लस दिलेली वेळ आणि बाहेर पडण्याची अचूक वेळ लिहून ते टोकन जमा करून घेण्यात येत होते. संबंधित व्यक्तीकडून संमतीचा अर्जही भरून घेण्यात येत होता.  लस दिल्यानंतर त्याची माहिती तत्काळ ऑनलाइन वेबसाईटवर अपलोड करण्यात आली.

अर्धा तास निरीक्षणाखाली

लस दिलेल्या व्यक्तीला अर्धा तास निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. लस दिल्यानंतर काही त्रास होतोय का हे पाहूनच बाहेर सोडण्यात येत होते. सहा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे पथक आणि  अतिदक्षता विभागातील पाच खाट तयार ठेवण्यात आले होते.

उत्साहाचे वातावरण

जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 30 हजार 184 आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लस दिली जाईल.  लसीकरण केंद्रावरील कर्मचारी आणि अधिकारी यांच्यात उत्साहाचे वातावरण होते.  केंद्रासमोर रांगोळी घालण्यात आल्या होत्या, सजावट करण्यात आली होती.  केंद्रात कोविड लसीबाबत माहिती देणारी भित्तीपत्रके लावण्यात आली होती. नोंदणी कक्ष, लस टोचणीचा कक्ष आणि त्यांनतरचा निरीक्षण कक्षात कर्मचारी सज्ज होते.

अठ्ठावीस दिवसांनी पुन्हा लस देणार

कोरोनावरील लसीचे दोन डोस घेणे आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. आज लस दिल्यानंतर त्याच व्यक्तींना २८ दिवसांनी लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

पहिल्या दिवशी प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे ११०० लस देण्याचे काम सुरू झाले. सोलापूर शहरातील दाराशा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अश्विनी सहकारी रुग्णालयात तर ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालय- अक्कलकोट, ग्रामीण रुग्णालय- बार्शी, उपजिल्हा रुग्णालय- करमाळा, उपजिल्हा रुग्णालय- अकलूज, ग्रामीण रुग्णालय – मंगळवेढा, उपजिल्हा रुग्णालय – पंढरपूर, ग्रामीण रुग्णालय – सांगोला, अश्विनी ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय – कुंभारी येथे लस देण्याचे काम सुरू झाले.


Back to top button
Don`t copy text!