दैनिक स्थैर्य । दि. १६ जून २०२२ । सोलापूर । राज्याची पंचायती राज समिती बुधवारपासून सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. त्यांनी जिल्ह्यातील कामकाजाला सुरूवात केली आहे. आज जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेऊन विभागप्रमुखांना विविध सूचना केल्या.
पंचायत राज समितीचे अध्यक्ष संजय रायमूलकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या दिवशी सकाळी शासकीय विश्रामगृहात स्थानिक आमदार यांच्यासोबत जिल्ह्यातील प्रश्न, अडीअडचणी, सूचना याबाबत समितीने चर्चा केली.
समितीने जिल्हा परिषदेमध्ये 2015-16, 2016-17 च्या लेखा परीक्षण पुनर्विलोकन अहवालाबाबत प्रत्येक विभागाचा आढावा घेण्यात आला. समिती सदस्य, अध्यक्ष यांनी कामाबाबत सूचना केल्या. समिती सदस्यांमध्ये सर्वश्री आमदार विक्रम काळे, कैलास पाटील, अनिल पाटील, सदाशिव खोत, महादेव जानकर, शेखर निकम, माधवराव पवार, डॉ देवराव होळी, कृष्णा गजबे, विजय रहांगडाले, किशोर जोरगेवार, अंबादास दानवे, किशोर दराडे, रत्नाकर गुट्टे यांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दोन वर्षात जिल्हा परिषदेने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती दिली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.
उद्या समिती पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा यांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. गटविकास अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठका होणार आहेत.
सायकल बँक उपक्रमास चालना
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांना सायकल नसल्याने मुली शाळेत जात नसल्याची बाब समजल्याने त्यांनी लोकसहभागातून सायकल बँक तयार केली. या उपक्रमाची माहिती पंचायती राज समितीच्या अध्यक्ष श्री. रायमूलकर आणि सदस्यांना समजल्यानंतर सर्वांनी एकमताने या उपक्रमाला चालना देण्याचा ठराव केला. त्यानुसार 16 सदस्यांनी 16 सायकली जिल्हा परिषदेला भेट दिल्या.
ग्रामीण भागातील गरीब मुली उच्च शिक्षीत झाल्या पाहिजेत. सायकलीविना त्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, या सामाजिक जाणिवेतून सायकल बँकेला मदत करण्याचे ठरले. या उपक्रमाला प्रोत्साहन दिले तर गरीब, होतकरू मुली शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, असे श्री. रायमूलकर यांनी सांगितले.