दैनिक स्थैर्य । दि. २७ डिसेंबर २०२२ । सातारा । बौद्धजन पंचायत समिती संलग्न पर्यटन समिती या समितीच्या विद्यमाने चिपळूण तालुका हित संरक्षक समिती, शाखा नांदगाव ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी या शाखेच्या आदर्श सभासद कालकथित द्रोपतीबाई गंगाराम कांबळे यांचा दुसरा स्मृतिदिन पर्यटन समितीच्या विद्यमाने समितीचे अध्यक्ष आदरणीय मुकुंद महाडिक साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नेपाळ लुंबिनी येथे संपन्न झाला.
सदर प्रसंगी सर्व धार्मिक विधी श्रीधर साळवी व रवींद्र लोखंडे यांनी मधुर वाणीने पार पाडले तसेच अभिवादन सभेत श्रीधर साळवी, रवी लोखंडे, राजाभाऊ तथा रामदास गमरे, अंजली ताई मोहिते यांनी दिवंगत द्रौपतीबाईंच्या जीवनाचा आढावा घेत त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत सदाचारी अर्पण केली, अध्यक्षीय भाषणात मुकुंद महाडिक साहेब म्हणाले “मृत्यू हे परिवर्तन आहे, ज्याला प्रत्येकाला सामोरे जावेच लागणार आहे, द्रौपतीबाई व त्यांच्या परिवार हा नेहमीच धम्मकार्यात आघाडी वर राहिला आहे, त्यांचं योगदान मोठ आहे म्हणून त्यांची उणीव ही सदैव जाणवत राहील” त्यांनी मातेच्या अनेक आठवणीला उजळत मार्गदर्शन केलं व श्रद्धांजली अर्पण केली.
सध्या बौद्धजन पंचायत समिती संलग्न पर्यटन समिती या समितीचे शिष्टमंडळ कुशीनगर येथे गौतम बुद्धाने आनंदाला जवळ घेऊन “तीन महिन्यानंतर माझे महापरिनिर्वाण होणार आहे” ही भविष्यवाणी जेथे केली त्या स्थळापासून ते वैशाली बुद्धाने अंतिम समयी शेवटचे जल प्राशन केले ते माता कुवर मंदिर त्याचप्रमाणे महापरिनिर्वाण दिन ते अंतिम संस्कार व आठ देशांना अस्थी वितरण या सर्व धम्मस्थळांना भेट देत खऱ्या इतिहासाची माहिती संकलित करत पर्यटकांना मार्गदर्शन करीत सदर शिष्टमंडळ भ्रमण करत लुंबिनी नेपाळ येथे दाखल झाले आहे, गौरवशाली बौद्ध संस्कृतीचा खरा इतिहास संकलित करून जनमानसात त्याचा प्रचार, प्रसार करण्याच्या उद्देशाने भ्रमण करत शिष्टमंडळ पुढे जात आहे.
आपल्या आईचा स्मृतिदिन बौद्धजन पंचायत समिती संलग्न पर्यटन समितीच्या वतीने लुंबिनी या ठिकाणी साजरा केल्याबद्दल अशोक कांबळे व त्यांच्या पत्नी यांना भरून आले होते त्यानी साश्रु नयनांनी पर्यटकांचे व पर्यटन समितीच्या शिष्टमंडळाचे आभार मानले व बौद्धाचार्यांनी सामुदायिक वंदना घेऊन स्मृतिदिन कार्यक्रमाची सांगता केली. सध्या शिष्टमंडळ पुढील स्थानांना भेटी देत धम्मकार्याची धुरा सांभाळत रवाना झाले आहे असे सुरेश मंचेकर यांनी समितीच्या वतीने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.