दैनिक स्थैर्य । दि.२२ नोव्हेंबर २०२१ । माण । सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी दहीवडीत आज सोसायटी मतदार संघातून 74 पैकी 72 जणानी मतदानाचा हक्क बजावला. आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार मनोज पोळ यांना सर्व मते दिल्याची चर्चा झाल्याने या निवडणुकीत अटीतटीची लढाई झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेखर गोरे बाजी मारणार की मनोज पोळ हे आज मतपेटीत बंद झाले आहे.
आज सकाळी आठ वाजता मतदान सुरुवात झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोज पोळ यांच्या गटाने सकाळी दहा वाजता मतदान केले. सकाळी 11 वाजेपर्यंत सोसायटी मतदार संघातील 18 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर साडे बाराच्या सुमारास शेखर गोरे यांच्या गटाच्या मतदारांनी मतदान केले त्यावेळी 44 मतदान झाले होते.
पावसाच्या हलक्या सरी मधून मधून पडत असल्यामुळे मतदानात व्यत्यय येत होता. मतदान केंद्राबाहेर गटागटाने राजकीय मंडळी ठाण मांडून बसली होती. दोन्ही उमेदवारांची मते झाल्याने दोन्हीकडे ही शांतता होती. आता फक्त आमदार गोरे यांच्या गटाची मते बाकी होती सुमारे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास आमदार जयकुमार गोरे यांचे सर्व मतदार व स्वतः आमदार मतदार केंद्रजवळ आले. त्यातील सात मतदार वगळता सर्वांनी मतदान केले.
काही मतदार मतदान केंद्राबाहेर सुमारे अर्धा तास रेंगाळत होते. मतदान संपण्यास दहा मिनिटे बाकी असताना उरलेले सर्व मतदार मतदान केंद्रात गेले व त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान संपण्यास पाच मिनिट बाकी असताना माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी मतदान केले व मतदानाचा कालावधी संपला. सोसायटी मतदार संघातील 74 पैकी 72 जणांनी मतदान केले.