दैनिक स्थैर्य । दि. २४ सप्टेंबर २०२२ । सतारा । सातारा- सातारा तालुक्यातील परळी, केळवली, वावदरे आणि ठोसेघर भागातील अतिदुर्गम अशा खेडोपाडी एस. टी. बस नियमितपणे सुरु नाही. तेटली, बामणोली या भागातही तीच परिस्थिती असून प्रवाशांची आणि खास करून शाळा, महाविद्यालयातील मुलांची मोठी गैरसोय होत असल्याने आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तडक सातारा बस स्थानक गाठले आणि विभाग नियंत्रक, डेपो मॅनेजर आदींची चांगलीच कानउघाडणी केली.
सातारा तालुक्यातील परळी, केळवली, वावदरे, ठोसेघर या भागातील अतिदुर्गम अशा खेडोपाडी एस. टी. नियमितपणे सुरु नाही. एस. टी. बस सकाळी आली तर सायंकाळी येत नाही. शनिवार आणि रविवारी बस बंदच असते. अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे मिळतात. वयस्कर लोक, रुग्ण, शाळेतील विद्यार्थी आणि रोजंदारीसाठी कामाला जाणारा कामगार वर्ग तसेच महाविद्यालयीन तरुणींची मोठी गैरसोय होत आहे. अशा तक्रारी परळी, ठोसेघर भागातील ग्रामस्थांनी आ. शिवेंद्रसिंहराजेंकडे केल्या. ग्रामस्थांची समस्या सोडविण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास सातारा बस स्थानकातील विभाग नियंत्रकांच्या कार्यालयात पोहचले. कार्यालयात विभागनियंत्रक रोहन पलंगे यांच्यासह डेपो मॅनेजर आणि इतर सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी परळी, ठोसेघर भागातील दिपक देवरे, बाळू बंडू देवरे, नेताजी चिकणे, जगन्नाथ निपाणे, गणेश चव्हाण, रामचंद्र जगताप,सुनील जगताप, सुनील लोटेकर, रोहिदास जगताप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
परळी, ठोसेघर परिसरातील रस्ते चांगले आहेत मग तुमची बस का जात नाही. एस. टी.च्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या समस्यांचे काहीही देणेघेणे नाही अशी परिस्थिती असून लोकांच्या गैरसोयींकडे तुम्ही गांभीर्याने पाहत नाही. ज्यांना काम करायचे नसेल त्यांनी स्वतःहून आपली बदली दुसरीकडे करून घ्यावी. मला काम करणारी माणसं पाहिजेत. त्यामुळे कोण कुठला आहे? जिल्ह्यातला आहे का बाहेरचा आहे, याच्याशी मला देणंघेणं नाही. तातडीने पूर्वीच्या वेळापत्रकाप्रमाणे बससेवा सुरु झाली पाहिजे. अन्यथा मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल, अशा कडक शब्दात आ. शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. तसेच तेटली, बामणोली या भागातही तीच परिस्थिती असून याठिकाणचीही बससेवा सुरळीत ठेवा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. विभाग नियंत्रक पलंगे यांनी बससेवा त्वरित सुरळीत करतो आणि आपण स्वतः लक्ष ठेवतो असे सांगितले.