दैनिक स्थैर्य । दि. २९ नोव्हेंबर २०२१ । सातारा । देशाचे थोर नेते यशवंतरावजी चव्हाण यांचा सहवास व प्रेम आपल्याला लाभले. आयुष्यातील चांगल्यावाईट प्रसंगावेळी ते सदैव पाठीशी उभे राहिले. त्यांच्याच सांगण्यावरून स्तंभलेखनाला सुरूवात केली आणि शब्दफुलांची सूर्यफुले झाली असे सांगत सातारा येथील ज्येष्ठ पत्रकार ‘सूर्यफुल’ कार जयवंत गुजर यांनी आपल्या सहा दशकांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची पाने ओघवत्या शब्दात उपस्थितांसमोर उलगडून दाखवली.
निमित्त होते जयवंत गुजर तथा दादा अभिष्टचिंतन सोहळ्याचे.वयाची ८९ वर्षे पूर्ण करून ९० व्या वर्षात पदार्पण केले.
त्यानिमित्त हॉटेल लेक व्ह्यूच्या लॉनवर आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार विजय मांडके व प्रसिध्द रंगकर्मी सुजीत शेख यांनी जयवंत गुजर प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत दादांनी चौफेर फटकेबाजी करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून सोडले. –
याप्रसंगी दैनिक ऐक्यचे संपादक शैलेंद्र पळणिटकर, प्रसिध्द धन्वंतरी डॉ. सुरेश शिंदे, ज्येष्ठ विचारवंत सतीश कुलकर्णी , राजेंद्र घुले, प्रा. डॉ धनंजय देवी, हिताची कंपनीचे सरव्यवस्थापक (कार्पोरेट) बी.डी. गाजी, श्रीकांत देशमुख, पत्रकार गजानन चेणगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी गुजर यांना शतायुषी होण्याच्या शुभेच्छा दिल्या.
सुर्यफुल सदराचे नाव खरे तर शब्दफुले असे ठरवले होते. त्यात पहिल्याच दिवशी ‘एकच सूर्य, बाकी सर्व सुर्यफुले’ या शीर्षकाखाली यशवंतराव चव्हाण यांच्याविषयी लिहिले. ते वाचून त्यांनी मनापासून दाद दिली आणि ‘सुर्यफुल’ हेच नाव असुदे म्हणून सांगितले. याच नावाने अखंड ३५ वर्षे लिहित गेलो. प्रदीर्घकाळ स्तंभलेखनाचा विश्वविक्रम झाला. वाचकांचे उदंड प्रेम मिळाले, ही सारी ‘यशवंतकृपा’ म्हटली पाहिजे अशा शब्दात जयवंत गुजर यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. ‘दाढीतील केसाइतके पदवीधर केले, पण एकही पत्रकार करू शकलो नाही. बहुजन समाजातील दीनदुबळ्यांच्या वेदना मांडण्यासाठी तू पत्रकारिता कर’ असे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सांगितल्यानंतर कथालेखन थांबवून पत्रकारितेचे व्रत अंगिकारले. त्यांना दिलेले वचन निष्ठेने पाळले. आजही तो वसा सोडलेला नाही, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. मुंबई इलाख्याचे पहिले पंतप्रधान सर धनजीशा कुपर यांचाही त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. कुपर यांच्या चरित्रलेखनाने आपल्याला खूप मोठे केले असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासात आलेले अनेक अनुभव,किस्से, कसोटीचे क्षण श्रोत्यांशी शेअर केले. जयवंत गुजर यांनी स्तंभलेखनात विक्रम केला यापेक्षा ते आपल्या विचारांशी
एकनिष्ठ राहिले हे आपल्याला फार महत्त्वाचे वाटते. लेखणीच्या माध्यमातून महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम करणारयांमध्ये त्यांचे स्थान अग्रस्थानी आहे, असे उद्गार सतीश कुलकर्णी यांनी यावेळी काढले. या कार्यक्रमात जयवंत गुजर मित्र समूह, वाचक, हितचिंतक व तमाम सातारकरांच्या वतीने त्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे डॉ. सुरेश शिंदे यांनी प्रत्यक्ष सुर्यफुल देऊन अनोख्या पध्दतीने त्यांच्या कार्याचा गौरव केला. सुजीत शेख यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी साईशक्ती पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी निवडीबद्दल राजेंद्र घुले यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. प्रारंभी मनस्वी मोरे हिने स्वागत केले.