दैनिक स्थैर्य । दि. २९ सप्टेंबर २०२२ । फलटण । गेल्या दोन तीन वर्षांपासून कोरोनाच्या सावटामुळे प्रत्येक सणांच्या उत्साहावर विरजण पडले होते. परंतु यावर्षी अगदी श्रावण महिन्यापासून म्हणजे मंगळागौर, गौरी-गणपती आणि सध्या नवरात्रीमध्ये महिला, पुरुष यांचा उत्साह ओसंडून वाहत आहे.
ठिकठिकाणी दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच नवरात्रीनिमित्त अनेक देवीमंदिरात तसेच ज्या ठिकाणी दुर्गामातेची मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे या ठिकाणी विविध कार्यक्रमंचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी महिला वर्गाचा उत्साह द्विगुणित झालेला आढळत आहे. सप्तशती, श्रीसुक्त, भजन अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महिलांच्या समुहाने रस्त्यावर नवरात्र उत्सवाचे वेगळे रुप आढळून येत आहे. त्याचप्रमाणे दररोजच्या देवीच्या रंगाप्रमाणे महिला साड्या अथवा ड्रेस परिधान करुन ग्रुप अथवा वैयक्तिक फोटो काढताना आढळत आहेत.
फलटण शहरातील तळ्यातील देवी ही तुझजाभवानीचे स्थान असल्याचे सांगीतले जाते. या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे फुलांची आरास केली जाते. शिंपी गल्ली येथील कोल्हापूरची देवी येथे दररोज वेगवेगळ्या प्रकारची सजावट केली जात आहे. त्याचप्रमाणे माळजाई परिसरात महिलांच्या भोंडल्याच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्याचप्रमाणे शंकरमार्केट रोडवर प्रतिष्ठापना करण्यात आलेली देवी हिला भानुची देवी असे म्हटले जाते. या ठिकाणीही वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अशा प्रकारे ठिकठिकाणी नवरात्रौत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे.