दैनिक स्थैर्य । दि.२४ जानेवारी २०२२ । मुंबई । भारतीय प्रजासत्ताकाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित होणाऱ्या मुख्य शासकीय समारंभाची रंगीत तालीम आज दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर झाली. राजशिष्टाचार विभागाचे उपसचिव उमेश मदन यांनी ध्वजारोहण केले. यावेळी अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुपकुमार सिंग उपस्थित होते.
या कार्यक्रमात गोवा पोलीस, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल, बृहन्मुंबई पोलीस सशस्त्र दल, बृहन्मुंबई पोलीस वाद्यवृंद पथक तसेच बृहन्मुंबई अश्वदलाने राष्ट्रध्वजाला सलामी दिली. मुंबई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपायुक्त निलोत्पल हे संचलन प्रमुख होते.
यावेळी सन 2020 साली झालेल्या प्रजासत्ताक दिन संचलनात उत्कृष्ट संचलन केलेल्या पथकांना अनुपकुमार सिंग यांच्या हस्ते प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात आली. शासकीय सेवेतील सहभागी पथकांमध्ये गडचिरोली व गोंदिया जिल्ह्याच्या सी 60 पथकाला प्रथम, बृहन्मुंबई पोलीस दंगल नियंत्रण पथकाला द्वितीय तर महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलाला तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. शालेय सहभागी पथकांमध्ये आरसीपी (मुली) रूस्तमजी इंटरनॅशनल स्कुल, दहिसर (पश्चिम) यांना प्रथम तर आरएसपी (मुले) सेंट पॉल्स कॉन्व्हेंट हायस्कूल, दादर (पूर्व) यांना द्वितीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिबानी जोशी यांनी केले.