दैनिक स्थैर्य । दि.२५ जानेवारी २०२२ । सातारा । जिल्ह्यातील महविद्यालयांमध्ये प्रवेशित असणाऱ्या सर्व प्रवर्गातील पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज सात दिवसांच्या आत शंभर टक्के भरले जातील, असे नियोजन करण्यात यावे. विद्यार्थी ज्या दिवशी अर्ज भरेल त्याच्या दुसऱ्याच दिवशी अर्ज पडताळणी करुन पात्र विद्यार्थ्यांचा अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण सातारा यांच्या कार्यालयाकडे मंजुरीसाठी वर्ग करण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.
शिष्यवृत्ती ही मागासवर्गीय प्रवर्गातील विद्यार्थ्यांशी संबंधीत असल्याने यास प्रथम प्राधान्य द्यावे. याबाबत कोणत्याही प्रकारे टाळाटाळ अथवा हलगर्जीपणा करु नये. मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्यास महाविद्यालय व महाविद्यालय प्रशासन यांना जबाबदार धरण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कळविले आहे.