स्थैर्य, फलटण: करोना या जीवघेण्या आजारामुळे लॉकडाउनमुळे फलटणची बाजारपेठ ठप्प झाली आहे. यामुळे दैनंदिन जीवन दिवसेंदिवस हलाखीचे सुरु झाले असल्याची कल्पना महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांना येथील व्यापार्यांनी दिली. याबाबत आमदार दीपक चव्हाण यांनी तातडीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला असता फलटणची बाजारपेठ पूर्ववत करण्यासाठी आपण सहकार्य करणार असल्याचे सांगून येत्या एक ते दोन दिवसात या बाबत आदेश देण्यात येत असल्याची ग्वाही दिली.
करोना या जीवघेण्या आजाराने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. त्याच पार्श्वभूमीवर जवळपास अडीच ते तीन महिने संपूर्ण बाजारपेठ ठप्प असून जनजीवन पूर्ववत व्हावे अशी अपेक्षा धरून फलटण येथील व्यापार्यांनी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली व संचारबंदी मुळे सर्वांचे व्यवसाय बंद आहेत व हलाखीचे दिवस सुरू झाले आहेत. बारामती येथे ज्या प्रमाणे बाजारपेठ सुरू झाली आहे त्या प्रमाणे आपल्या इथे बाजारपेठ सुरू होणे आवश्यक आहे, असे म्हणणे सर्व व्यापार्यांनी आमदार दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या जवळ व्यक्त केले तर त्या वर आमदार दीपक चव्हाण यांनी सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासोबत दुरध्वनीवरून संवाद साधला व फलटणच्या व्यापार्यांच्या अडीअडचणी सांगितल्या, त्या वर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या वर शासनाचे निर्देश आले की आपल्या जिल्ह्यासाठी लगेच आदेश निर्गमित होतील असे सांगितले व आज किंवा जास्तीत जास्त उद्या संध्याकाळ पर्यंत आदेश निघावेत अशी सूचना आमदार दीपक चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्यावर नक्कीच तसेच होईल असे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आमदार दीपक चव्हाण यांना सांगितले.
करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मुळे फलटण शहरातील बाजारपेठ गेली दीड दोन महिन्यांहुन अधिककाळ बंद असल्याने व्यापारी, छोटे व्यावसाईक, हातगाडीवाले, वडापाव वगैरे तत्सम खाद्यपदार्थ विक्रेते त्याचप्रमाणे या व्यवसायातील नोकरदार, रिक्षा, माल वाहतुकीचे वाहनधारक वगैरे सर्व घटकांचे मोठे नुकसान होत असून आता शहरातील बाजारपेठ सुरु करण्यास अनुमती द्यावी अशी मागणी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेश दोशी यांचे नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाने आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनला फलटण शहर व तालुक्यातील सर्व व्यापार्यांनी शासनाच्या सर्व आदेशाचा आदर करुन सर्वतोपरी पाठिंबा दिला आहे. त्यातच शासनाच्या आदेशाप्रमाणे प्रशासन नित्यनवे आदेश काढत आहेत. यामुळे व्यापार्यांच्या संभ्रमात भरच पडत असून काहींना तोटा होत आहे. यामुळे व्यापार्यांनी आज फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांची भेट घेतली होती व व्यवसाय सुरु करण्याची परवानगी मागितली परंतु उपविभागीय अधिकार्यांनी कंटेनमेंट झोन व बाजारपेठ वगळता इतरत्र व्यवसायास परवानगी असल्याचे स्पष्ट करुन ग्रामीण भागात यापुर्वीच परवानगी दिल्याचे सांगितले तसेच ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या पाच हजाराच्या वर आहे अशा ठिकाणी विषम तारखेस व्यवसाय सुरु राहतील असे सांगितले. यावेळी काही व्यापार्यांनी बेकायदेशीररित्या व्यवसाय करणार्या अनेक व्यापार्यांवर कारवाई होत नसल्याचा संताप व्यक्त केला. यावेळी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना दंडात्मक कारवाईसह गुन्हे दाखल करावयास सांगितले असल्याचे उपविभागीय अधिकारी यांनी स्पष्ट केले. तसेच आपण केवळ सातारचे जिल्हाधिकारी यांचेच आदेशाचे पालन करत असून शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार आगामी काळात जिल्हाधिकारी जे आदेश देतील ते आपणाला कळवू असे ही उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप यांनी सांगितले.
व्यापारी महासंघाच्या माध्यमातून शहरातील कापड, स्टेशनरी, कटलरी, फर्निचर, खेळणी, सौंदर्य प्रसाधने व महिलांविषयक वस्तूंची दुकाने, मिठाई, बांधकाम साहित्य, पुस्तक व शालेय स्टेशनरी वगैरे विविध प्रकारचे व्यावसाईक व त्यांच्या संघटनांचे प्रतिनिधी यांनी प्रांताधिकारी यांची भेट घेऊन दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्याची मागणी केली, त्यानंतर सर्व व्यापार्यांनी आ. दीपक चव्हाण, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेऊन त्यांचे कडेही वरीलप्रमाणे माहिती देऊन शहरातील व्यापार व्यवहार सुरु झाले पाहिजेत अशी आग्रही मागणी केली.
फलटण शहरातील व्यापार्यांनी लॉक डाऊन व अन्य सर्व सूचनांचे पालन करुन प्रसंगी नुकसान सोसून व्यापार व्यवहार बंद ठेवले, त्याचवेळी काही कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू किट वाटप, शहरात शासन/प्रशासन व नगर पालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या अन्न छत्राना सहकार्य किंवा करोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविताना सहकार्याची भूमिका येथील व्यापार्यांनी व्यापारी संघटना, स्वयंसेवी संस्था/संघटनांच्या माध्यमातून घेतल्याचे निदर्शनास आणून देत आता बाजार पेठ सुरु करावी अशी आग्रही मागणी केली.
पुणे जिल्हा रेड झोनमध्ये असताना शेजारच्या बारामती शहरातील, सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते शहरातील व्यापार व्यवहार सुरळीत सुरु झाले आहेत, साहजिकच येथील ग्राहक 20/25 कि. मी. अंतरावरील या दोन्ही बाजार पेठांमध्ये जाऊन खरेदी करीत असल्याने येथील व्यापार्यांचे मोठे नुकसान होत असून येथील बाजार पेठेवर अवलंबून असणारे अन्य घटक व कामगार/कर्मचार्यांचे नुकसान होत असल्याने येथील बाजारपेठ सुरु करण्याची आवश्यकता प्रांताधिकारी व लोकप्रतिनिधी यांचेकडे करण्यात आली.
मे महिन्याची सुट्टी लक्षात घेऊन अनेक व्यापार्यांनी लहान मुलांची खेळणी व अन्य साहित्याची मोठी खरेदी केली, गुढी पाडवा, अक्षय तृतीया या सणाच्या पार्श्वभूमीवर लोक चार चाकी/दुचाकी वाहने खरेदी करतात त्याचा मोठा स्टॉक सदर व्यापार्यांनी केला आहे, अनेक बांधकामे पूर्ण करुन वरील सणाच्या पार्श्वभूमीवर त्याचा ताबा देण्याची प्रथा असल्याने त्यामध्ये बांधकाम व्यावसाईकांनी केलेली गुंतवणूक वगैरे सर्व व्यापार्यांनी केलेली खरेदी/गुंतवणूक अडकून पडली आहे, काही माल अद्याप ट्रान्सपोर्ट मध्येच अडकुन पडला आहे, सदर व्यापार्यांचा बाकीच्या वसुलीसाठी तगादा सुरु आहे, दुकाने बंद असली तरी जागा भाडे, वीज बिल, म्युनिसिपल कर वगैरे खर्च सुरु आहेत त्यातून व्यापारी मेटाकुटीला आला असल्याने आता बाजारपेठ सुरु होऊन चलन फिरण्याची आवश्यकता आहे, त्यातून व्यापारी आणि त्यावर अवलंबून असणार्या अन्य घटकानाही दिलासा मिळणार असल्याने फलटणची बाजारपेठ त्वरित सुरु करावी अशी आग्रही मागणी सर्वच व्यापार्यांनी केली आहे.