
स्थैर्य, फलटण, दि. १२ ऑक्टोबर : विश्व जैन समुदायाच्या आवाहनानुसार, फलटण येथे जैन सोशल ग्रुप आणि श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक ‘भक्तामर स्तोत्र’ पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम दि. ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजून ९ मिनिटांनी येथील श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिरात पार पडला.
या कार्यक्रमात जैन सोशल ग्रुप, सन्मती महिला मंडळ, संगिनी फोरम आणि श्री चंद्रप्रभू युवक मंडळ यांचे सदस्य तसेच फलटण शहरातील बहुसंख्य श्रावक-श्राविका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनी संयुक्तपणे भक्तामर स्तोत्राचे पठण केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन यांनी केले, यावेळी त्यांनी भक्तामर स्तोत्र पठणाचे महत्त्व आणि या जागतिक उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमाला मंदिराचे विश्वस्त आणि सर्व सहयोगी संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.