दैनिक स्थैर्य | दि. २ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
स्वच्छ भारत अभियान २ अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार दि. १५ सप्टेंबर ते दि. ०२ ऑक्टोंबर दरम्यान फलटण शहरात स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करुन स्वच्छता विषयक विविध उपक्रम नागरिक व शहरातील विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून राबविण्याचे नियोजन केल्याची माहिती नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी दिली आहे.
या पंधरवड्याचा एक भाग म्हणून फलटण नगर परिषदेने इंडियन स्वच्छता लीग २.०, सफाई मित्र यांच्याकरिता सेवा व सुरक्षा शिबीर, श्रमदान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे फलटण नगर परिषद प्रशासक तथा मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी सांगितले.
सदर पंधरवडा अभियानाची नोंदणी पोर्टलवर करुन शहरातील एकूण १२ प्रभागामध्ये प्रत्येकी २ याप्रमाणे २४ स्वच्छता विषयक श्रमदान कार्यक्रमांचे आयोजन स्थानिक जनसहभाग, प्रतिष्ठीत व्यक्तींच्या उपस्थीतीत करण्यात आले. त्यामध्ये दि.१ ऑक्टोबर रोजी आयोजित श्रमदान कार्यक्रमात ६५० व्यक्तींच्या सहभागाने अंदाजित २२ हजार २५० चौ. मी. एवढे क्षेत्र स्वच्छ करण्यात आले त्यामध्ये २.९ टन कचर्याचे संकलन करण्यात आले. यावेळी नगर परिषद १६ घंटागाडी, २ ट्रॅक्टर व त्यावरील कर्मचारी यांनी मोठे काम केले.
श्रमदानामध्ये क्रेडाई फलटण यांनी श्रीमंत मालोजीराजे पुतळा व माळजाई उद्यान परिसर येथे, बिल्डर्स असोसिएशन फलटण यांनी विमानतळ परिसर, मुधोजी महाविद्यालय विद्यार्थी व शिक्षक यांनी महाविद्यालय परिसर, अप्पासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांनी प्रांताधिकारी व तहसील कार्यालय परिसर येथे, पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व फलटण शहर पोलीस ठाणे परिसर येथे, न्यायालय कर्मचारी यांनी फलटण न्यायालय येथे, प्रा. आरोग्य केंद्र फलटण शहर येथे संबंधीत आरोग्य कर्मचारी यांनी तर सर्व प्रा. शाळा परिसरात विद्यार्थी व शिक्षकांच्या सहभागाने सकाळी १० ते ११ दरम्यान उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्टेट बँक ऑफ इंडिया, फलटण शाखा यांनी सहभाग नोंदवून स्वच्छता विषयक आवश्यक साहित्याचा पुरवठा केला.
दरम्यान अभियानाच्या मूळ उद्देशास अनुसरुन दि. २७ सप्टेंबर रोजी फलटण नगर परिषद प्रशासकीय इमारतीमध्ये सफाई कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करुन बँकामार्फत उपलब्ध असलेल्या आर्थिक योजनांची माहिती देण्यात आली. सर्व अधिकारी, कर्मचारी स्वच्छता अभियान मोहिमेत सहभागी झाले होते.
प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचेसह सर्वच अधिकार्यांनी या मोहिमेत सहभागी होत आपल्या कार्यालय परिसराची स्वच्छता करुन घेताना मोहिमेत स्वतः सहभागी होऊन स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत स्वच्छता मोहीम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले.