गावपातळीवर दिव्यांगांची माहिती संकलित करा – पालकमंत्री सुनील केदार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि.०६ एप्रिल २०२२ । वर्धा । अनेक दिव्यांग बांधव त्यांच्या अडचणींमुळे नोंदणी करु शकत नाही किंवा शिबिरात येऊ शकत नाही. असे दिव्यांग वैश्विक ओळखपत्र पर्यायाने शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता असते. त्यामुळे गावपातळीवर दिव्यांग व्यक्तींची माहिती गोळा करुन त्यांना ओळखपत्राचा लाभ द्या, असे पालकमंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

देवळी येथे दिव्यांग व्यक्तींची तपासणी करुन त्यांना वैश्विक ओळखपत्राचा लाभ मिळवून देण्यासाठी नगरपरिषदेच्या सभागृहात अस्मिता दिव्यांग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी आ.रणजित कांबळे, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, नप गटनेत्या शोभाताई तडस, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.सत्यजित बडे, जिल्हा शल्य चिकित्सक डाँ. सचिन तडस, समाजकल्याण अधिकारी प्राजक्ता इंगळे आदी उपस्थित होते.

दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या उपक्रमाचे पालकमंत्री श्री.केदार यांनी कौतूक केले. एकही दिव्यांग व्यक्ती ओळखपत्रापासून वंचित राहू नये, त्यासाठी जिल्हाभर मोहीम राबविणे आवश्यक आहे. गावागावांमध्ये किती दिव्यांग आहे, त्याची माहिती संकलित करा. गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, नगराध्यक्ष, सरपंच यांचा माहिती संकलनासाठी सहभाग घ्या. अशी माहिती संललन करुन दिव्यांगाना लाभ दिल्यास राज्यात दिव्यांगांसाठीचे हे उत्तम काम होईल. असे सामाजिक उपक्रम वारंवार राबविले गेले पाहिजे, असे पुढे बोलतांना पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी वैश्विक ओळखपत्र एसटी प्रवासासह विविध योजनांसाठी उपयोगी पडणार असल्याने प्रत्येक दिव्यांग बांधवाने आपली नोंदणी करावे, असे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जिल्हाभर प्रशासनाच्यावतीने दिव्यांग शिबिरे आयोजित करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.

यावेळी पालकमंत्र्यांच्याहस्ते काही दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समाजकल्याण अधिकारी प्राजक्ता इंगळे यांनी केले. शिबिरात दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Back to top button
Don`t copy text!