फलटण एस.टी. डेपोतील पडकी भिंत प्रवाशांसाठी धोकादायक; रिक्षा संघटनेकडून पुनर्बांधणीची मागणी

अपघात आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ; महिला व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


स्थैर्य, फलटण, दि. २८ ऑगस्ट : फलटण एस.टी. डेपोमधील बारामती स्टँडवरची संरक्षक भिंत एस.टी. बसच्या धडकेने पडून पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लोटला तरी, अद्याप तिची दुरुस्ती न झाल्याने प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. या पडक्या भिंतीमुळे अपघात, चोरी आणि टवाळखोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, ही भिंत तातडीने बांधावी, अशी मागणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेने एका निवेदनाद्वारे आगार प्रमुखांकडे केली आहे.

डेपोतील बारामती स्टँडवरून बाहेर पडण्याच्या मार्गावर बांधकाम सुरू असल्याने तेथे खडी आणि इतर साहित्य पडले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रवाशांना, विशेषतः वयोवृद्ध, महिला आणि शालेय विद्यार्थ्यांना पडक्या भिंतीच्या बाजूनेच धोकादायक मार्गावरून ये-जा करावी लागत आहे. या भिंतीला लागून असलेल्या चारीत पडून अनेक प्रवासी जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

या मोकळ्या आणि असुरक्षित जागेचा फायदा टवाळखोर आणि भुरटे चोर घेत आहेत. बसची वाट पाहणाऱ्या महिला आणि विद्यार्थिनींना टवाळखोरांच्या त्रासाला सामोरे लागावे लागत आहे. तसेच, पाकीटमारी आणि चोरीच्या घटनांसाठी हा परिसर सोयीचा ठरत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या गंभीर परिस्थितीची दखल घेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेने फलटण आगार प्रमुखांना निवेदन सादर केले आहे. प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ही संरक्षक भिंत लवकरात लवकर पुन्हा बांधण्यात यावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.


Back to top button
Don`t copy text!