
स्थैर्य, 17 मार्च, सातारा : मार्चचा पहिला पंधरवडा संपला असताना एकिकडे दिवसभर सूर्य आग ओकू लागला आहे, तर दुसरीकडे मध्यरात्रीनंतर पहाटे आणि सकाळी सात वाजेपर्यंत चांगलाच गारठाही जाणवत आहे. पहाटे गारठा आणि दिवसभर उन्हामुळे घामटाच घामटा असे बदलते वातावरण अबालवृद्धांना त्रासदायक ठरत आहे. तापमानातील बदलामुळे रुग्णांची संख्या वाढू लागल्याचे चित्र गावोगावी दिसत आहे.
दुष्काळी पट्ट्यात सध्या पहाटे जाणवणारा गारठा आणि दिवसभर पडणारे कडक ऊन यामुळे हवामानात मोठी तफावत निर्माण झाली आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर होत असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्ती मोठ्या प्रमाणात सर्दी, खोकला, ताप आणि घशाच्या संसर्गान त्रस्त होत आहेत. दिवसागणिक दवाखान्यांमध्ये अशा रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासूनमध्यरात्रीनंतर आणि पहाटेच्या वेळी वातावरणात गारठा जाणवत आहे. सकाळी थंडावा असला तरी दुपारपर्यंत तापमान झपाट्याने वाढत असून, कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दिवसातच थंडी आणि उष्णतेचा अनुभव नागरिकांना घ्यावा लागत आहे. या बदलत्या हवामानामुळेनागरिकांचे आरोग्य बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे.
सर्दी, खोकला, ताप, घसा दुखणे, अंगदुखी आणि व्हायरल इन्फेक्शनच्या तक्रारी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना या बदलाचा अधिक त्रास होत आहे. दवाखान्यांमध्ये सर्दी-खोकला आणि तापाच्या रुग्णांची संख्या वाढल्याचेही दिसून येत आहे. हवामानातील अचानक बदलामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊन विविध आजारांना निमंत्रण मिळत आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगत आहेत.
उन्हाळा सुरू असल्याने दिवसभर सर्वत्र फॅन, कुलर, एसी सुरू असतात. अगदी मध्यरात्रीपर्यंत उकाडा जाणवत आहे. पहाटे मात्र वातावरणातील गारठ्यमुळे फॅन, कुलर बंद करावे लागत आहेत. पहाटे फिरायला जाणारे उबदार कपड्यात दिसत आहेत. पहाटेचा गारठा आणि दुपारचे कडक ऊन यामुळे शरीराला वातावरणाशी जुळवून घेणे कठीण जात आहे. त्यामुळेच सर्दी. खोकला आणि तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे.

