स्थैर्य, सातारा, दि. 11 : सध्या संपूर्ण जग कोविड-19 (कोरोना) या वैश्विक महामारीच्या कचाट्यात सापडले आहे. यासाठी भरपूर वैद्यकीय सेवा सुविधांची उपलब्धता असणे गरजेचे आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रुग्णांसाठी लागणारा रक्ताचा पुरेसा साठा असणे आवश्यक आहे. कर्नल आर. डी. निकम यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून राबवलेला रक्तदान शिबिराचा उपक्रम स्तुत्य आहे, असे मत माउली ब्लड बँकेचे अध्यक्ष डॉ. गिरीश पेंढारकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र माजी सैनिक व पेन्शनर्स संघटना व कर्नल आर. डी. निकम सैनिक सहकारी बँक लि., यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील आजी-माजी सैनिक, सैनिक महिला यांचे प्रेरणास्थान कर्नल आर. डी. निकम तथा दादा यांची 99 वी जयंती व दि. 10 जून 2020 ते 10 जून 2021 जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. पेंढारकर बोलत होते. बँकेचे सभासद, कार्यकर्ते, माजी सैनिक, महिला, शेतकरी, तरुण, व्यापारी, सेवक व त्यांचे नातेवाईक, हितचिंतक यांनी स्ययंस्फूर्तीने कोरोनासारख्या महामारीच्या कालावधीत सामाजिक अंतर व शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमावलींचे पालन करून 77 जणांनी रक्तदान शिबिरात भाग घेतला.
संघटनेचे व बँकेचे अध्यक्ष कॅप्टन उदाजी निकम व सरस्वती सैनिक महिला बचत गटाच्या प्रवर्तिका व बँकेच्या संचालिका सौ. पुष्पा निकम, संचालक ऑ. कॅप्टन रामचंद्र पवार, पेटी ऑफिसर अश्पाक पटेल, हवालदार संपत चव्हाण, डॉ. भट्टड, कुबेर, महिला, सेवकवर्ग, दैनंदिन ठेव प्रतिनिधी, ग्राहक व हितचिंतक उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रेरणास्थान कर्नल आर. डी. निकम व सरस्वतीताई निकम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
शासन व सर्व सेवाभावी संस्था रक्तदान करण्यासाठी लोकांना आवाहन करत आहेत. आपणही दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 17 वर्षाचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे चांगल्याप्रकारे सुरू ठेवण्यासाठी कर्नल आर. डी. निकम यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे, असे सांगून संघटनेचे व बँकेचे अध्यक्ष कॅप्टन उदाजी निकम म्हणाले, गेली 17 वर्षे 10 जून रोजी कर्नल साहेबांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करत आहोत. पूर्वी फार कमी प्रमाणात रक्तदान होत असे. जून महिन्यात पावसाळा असल्याने संघटना ऑफिसमध्येच आयोजन केले जात असे. जसजशी रक्तदात्यांची संख्या वाढली त्यामुळे शिबिर स्काउट अँड गाईड सभागृहात होऊ लागले. त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे महाव्यवस्थापक यशवंत देसाई यांनी केले.